सातारा, ९ जुलै (साहस Times) – साताऱ्यातील शिवथर गावात प्रेमप्रकरणातून एका विवाहितेची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पूजा जाधव (वय ३०) या महिलेचा तिच्या राहत्या घरात खून करण्यात आला. विशेष म्हणजे, पोलिसांनी अवघ्या बारा तासांत आरोपी अक्षय रामचंद्र साबळे याला पुण्यातून अटक केली असून, चौकशीत त्याने हे कृत्य प्रेमसंबंधातून केल्याची कबुली दिली आहे.
घटना सोमवारी (८ जुलै) शिवथर येथील गुजाबा वस्तीवर घडली. त्या दिवशी पूजाचे सासू-सासरे शेतावर गेले होते, तर पती प्रथमेश जाधव साताऱ्यातील आनंद ट्रॅव्हर्समध्ये नोकरीवर गेला होता. सात वर्षांचा मुलगा शाळेत, आणि भाऊ पुण्यात असल्याने पूजा घरात एकटीच होती. याच संधीचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला.
दुपारी घराचे दरवाजे उघडे असल्यामुळे शेजारील वृद्ध महिला घरात गेली असता, तिला पूजाचा मृतदेह आढळून आला. ग्रामस्थांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली होती.
सातारा तालुका पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून आरोपीचा शोध घेतला आणि तो पुण्यातून रात्री उशिरा गजाआड करण्यात आला. आरोपीवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.