फलटण, १ ऑगस्ट २०२५ साहस Times –मुंबई न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच अखेर वास्तवात; १८ ऑगस्टपासून न्यायदान सुरु होणार!
सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग – या सहा जिल्ह्यांमधील जनतेसाठी ही ऐतिहासिक घोषणा म्हणजे न्याय मिळवण्याच्या लढ्यात मोठा दिलासा आहे. यामागे तत्कालीन विधानपरिषद सभापती आणि फलटण-कोरेगावचे लोकप्रिय नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे मोलाचे योगदान असून, त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले, असे मत प्रितसिंह खानविलकर यांनी व्यक्त केले.
प्रितसिंह खानविलकर यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले की, ‘‘राज्याच्या विविध भागातून या मागणीसाठी आंदोलने झाली, उपोषण झाले. सातारा जिल्ह्यातील वकीलांचा संघर्ष असो की कोल्हापूर खंडपीठ कृती समितीचा आवाज – या सर्वांना एक राजकीय बळ देण्याचे काम श्रीमंत रामराजेंनी केले. मार्च २०२२ मध्ये झालेल्या मुंबईतील सर्वपक्षीय बैठकीत त्यांनीच हे प्रकरण विधानभवनात नेले.’’
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विधानभवनात झालेल्या विशेष बैठकीतही रामराजेंनी सहा जिल्ह्यांच्या न्यायिक अडचणी समजावून सांगत सर्किट बेंचची गरज अधोरेखित केली. त्यांचा आग्रह इतका ठाम होता की बैठकीनंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी तातडीने मुख्य न्यायमूर्तींना पत्र लिहिले, आणि त्यानंतर प्रक्रियेला वेग आला.
‘‘या निर्णयामुळे वेळ, पैसा व मानसिक त्रास वाचणार आहे. आम्हाला न्यायासाठी आता मुंबईच्या वाटा पाहाव्या लागणार नाहीत. आमच्या भागाला मिळालेला हा हक्क आणि श्रीमंत रामराजेंचे योगदान, हे आमच्यासाठी भूषणावह आहे,’’ असेही खानविलकर म्हणाले.