सातारा | साहस टाइम्स :-राज्यभरात शिक्षक बदली प्रक्रियेत संवर्ग १ मधून लाभ मिळवण्यासाठी काही प्राथमिक शिक्षकांनी खोटे, बनावट दाखले वापरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर प्रकरणावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत थेट प्रतिक्रिया देत संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्याचे स्पष्ट केले.
पुण्यनगरी दैनिकाने केलेल्या पत्रकारितेच्या आधारे उघड झालेल्या या घोटाळ्यात अनेक शिक्षकांनी बनावट, दिव्यांग, बनावट आजाराचे दाखले सादर केले असून, काहींनी तर पती-पत्नी सोबत राहत असूनही कागदोपत्री घटस्फोट घेतल्याचे उघड झाले आहे. फलटण तालुक्यात असे तब्बल १६ ‘कागदोपत्री घटस्फोट’ नोंदले गेले आहेत.
याबाबत साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना मंत्री जयकुमार गोरे म्हणाले,
“ही अत्यंत गंभीर बाब आहे. चुकीचे दाखले सादर करून बदलीचा लाभ घेणारे शिक्षक दोषी आहेतच, पण हे दाखले बनवून देणारे अधिकारी-कर्मचारीही तितकेच जबाबदार आहेत. सर्वच दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.”
याप्रकरणात सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन यांच्या तपासकार्यातील सतर्कतेचेही त्यांनी विशेष कौतुक केले.
“हा प्रकार केवळ साताऱ्यापुरता मर्यादित नाही. हे राज्यव्यापी रॅकेट असून संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारचे खोटे दाखले सादर करून शिक्षकांनी चुकीने बदली घेतल्याचे निदर्शनास येत आहे,” असे गोरे यांनी नमूद केले.
सध्या सर्व जिल्ह्यांमध्ये चौकशी प्रक्रियेचा वेग वाढवण्यात आला असून दोषींवर कायदेशीर कारवाई लवकरच होणार आहे.