
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी मोलाचे कार्य केले आहे. आजपर्यंत डॉ. आंबेडकर यांचे कार्य विविध भाषांमधून मालिका, माहितीपटाच्या माध्यमातून छोट्या पडदयावर दाखवण्यात आले आहे. यामध्ये झी मराठीनेही आपले पाऊल टाकले असून महानायक डॉ. आंबेडकर यांच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावरील प्रसंग, घटना दाखवणारी ही मालिका उत्सुकतेचा विषय बनली आहे. डॉ. आंबेडकर यांच्या बालपणापासून ते त्यांच्या विद्यार्थीदशेतील घटनांचा वेध घेण्याबरोबरच स्वातंत्र्यसंग्रामातील डॉ. आंबेडकर यांची भूमिका हा या मालिकेचा गाभा आहे. स्वतंत्र भारताला संविधानाचा पाया देण्यासाठी डॉ. आंबेडकर यांनी केलेला अभ्यास, दलित समाजाच्या उध्दारासाठी घेतलेले कष्ट यावर ही मालिका आधारीत आहे. डॉ. आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याबरोबरच डॉ. आंबेडकर हे व्यक्ती म्हणून कसे होते, त्यांचे कौटुंबिक आयुष्य कसे होते यावरही या मालिकेत प्रकाश टाकण्यात आला आहे.








