“दर रविवारी – चला बुद्धविहारी, आपले संविधान – आपले अधिकार” अभियानाची समतानगर येथून प्रेरणादायी सुरुवात

0
67
“दर रविवारी – चला बुद्धविहारी, आपले संविधान – आपले अधिकार” अभियानाची समतानगर येथून प्रेरणादायी सुरुवात

फलटण (प्रतिनिधी): भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने “दर रविवारी – चला बुद्धविहारी” आणि “आपले संविधान, आपले अधिकार” या जनजागृती अभियानाची प्रेरणादायी सुरुवात समतानगर (विडणी) येथून मोठ्या उत्साहात करण्यात आली.
या उपक्रमाचा उद्देश म्हणजे धम्मविचारांद्वारे समाजात बंधुभाव, समता आणि न्यायाची जाणीव निर्माण करणे तसेच भारतीय संविधानातील मूलभूत अधिकारांची जाणीव जनमानसात पोहोचवणे हा आहे.
सुरुवातीला समतानगर परिसरात मंगल मैत्रीची फेरी काढण्यात आली. फेरीमध्ये भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, उपासक-उपासिका, माता-भगिनी आणि बालक-बालिका यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
फेरीदरम्यान “भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म” हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथ आणि भारतीय संविधानाची प्रत सोबत ठेवून जागृती करण्यात आली. “धम्म आणि संविधान” या दोन आधारस्तंभांच्या माध्यमातून समाजात मंगल मैत्री, जागरूक नागरिकत्व आणि सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला. यानंतर बुद्धविहारात सूत्र पठण करण्यात आले. उपासक-उपासिकांनी भारतीय संविधानाप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्याचे रक्षण आणि संवर्धन करण्याची प्रतिज्ञा घेतली.

या वेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे महासचिव आयु. बाबासाहेब जगताप यांनी या अभियानाचा हेतू स्पष्ट करताना सांगितले की,
“भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्र व राज्यस्तरीय २५ कलमी कार्यक्रमांतर्गत धम्मप्रसार, शिक्षण, महिला सबलीकरण आणि संविधान जनजागृती हे प्रमुख उद्दिष्ट आहे. संपूर्ण तालुक्यात ५६ ग्राम शाखा स्थापन करून हे अभियान सातत्याने राबविण्यात येईल.”

त्याचाच एक भाग म्हणून “दर रविवारी चला बुद्धविहारी” या उपक्रमांतर्गत प्रत्येक रविवारी बुद्धविहारात एकत्र येऊन ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे वाचन, सूत्र पठण आणि विचारमंथन करण्यात येणार आहे. ग्राम शाखा स्थापनेसाठी उपस्थित उपासक-उपासिकांकडून अर्जही भरून घेण्यात आले.

भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे अध्यक्ष आयु. महावीर भालेराव सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले,
“धम्म आणि संविधान हे सामाजिक परिवर्तनाचे दोन पाय आहेत. प्रत्येक रविवारी बुद्धविहारात येऊन धम्मविचार, सूत्र पठण आणि संविधानाचे अध्ययन करा. पंचशीलाचे आचरण करून आपण समाज परिवर्तनाच्या कार्याला गती देऊ शकतो.”
त्यांनी पुढे पंचशील आचरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी धम्मगीत सादर केले.
‘पंचशीलानं पवित्र झालं जीवन माझं पुरं,बुद्धविहारानं नटलं माझं घरं’ यामुळे संपूर्ण वातावरण धम्ममय झाले.
या कार्यक्रमात आयु. बजरंग गायकवाड (संस्कार सचिव), अमोल भोसले, चंद्रकांत मोहिते (कार्यालयीन सचिव), विजयकुमार जगताप आयु. विठ्ठल निकाळजे सर( तालुका शाखा कोषाध्यक्ष) संघटक), तानाजी जगताप (साहित्यिक), प्रवचनकार सोमीनाथ घोरपडे, आयु. चंद्रकांत भोसले, आयु. अविनाश मोरे, आयु. हनुमंत भोसले, आयु. नंदकुमार जगताप, आयु. जगन्नाथ मोरे, आयु. गोरख कांबळे, आयु. प्रणव जगताप तसेच महिला उपासिका व बालक-बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.या अभियानाच्या माध्यमातून धम्मविचार आणि भारतीय संविधान मूल्यांचा संगम घडवत, समाजात जागृती आणि बंधुभावाचा संदेश देण्याचा संकल्प फलटण तालुका शाखेने केला आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष रामचंद्र मोरे यांनी केले. समारोप त्रिशरण-पंचशील ग्रहण व धम्मपालन गाथेने करण्यात आला.