
फलटण (ता. फलटण):भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सातारा पूर्व अंतर्गत फलटण तालुका महिला कार्यकारिणीचे गठण महाराष्ट्र राज्य महिला संघटिका व पश्चिम महाराष्ट्र प्रभारी आयुनी. राजश्रीताई सरावदे, जिल्हाध्यक्षा आयुनी. सुजाता गायकवाड आणि जिल्हा शाखा सातारा पूर्व अध्यक्ष आयु. नानासाहेब मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडले.
या निवड प्रक्रियेदरम्यान फलटण तालुका शाखेचे पदाधिकारी औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) येथे पार पडलेल्या पूज्य भंते करूणानंद थेरो यांच्या महाथेरो सन्मान व कठीण चिवरदान धम्मसोहळ्यात उपस्थित असल्याने त्या वेळी अनुपस्थित होते. पूर्व सूचना देऊन नियोजित निवड प्रक्रिया झाली असती तर आनंदच झाला असता.पण असो भारतीय बौद्ध महासभा व्यक्ती पेक्षा धम्माला सर्वोच्च स्थानी मानते. त्यामुळे या निवड प्रक्रियेचे आम्ही स्वागत करतो. छ. संभाजी नगर येथील या ऐतिहासिक कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे प्रमुख डॉ.भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या हस्ते होते.त्यामुळे फलटण तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि बौद्ध उपासक – उपासिका यांनी या कार्यक्रमाला जाण्याचा निर्णय घेतला. आणि या धम्म सहलीत सर्वजण सहभागी झाले.
धम्म सहलीहून परतल्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित महिला अध्यक्षा आयु. रंजना राजकुमार रणवरे यांच्या निवासस्थानी भेट देऊन सन्मान सोहळा आयोजित केला. त्यांना पुष्पगुच्छ, शॉल, धम्मध्वज आणि धम्मपट्टी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नव्या महिला कार्यकारिणीतील सरचिटणीस आयु. रुक्षलाताई भोसले, कोषाध्यक्षा आयु. वृषालीताई झेंडे तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील धम्मप्रचार कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
अध्यक्ष आयु. महावीर भालेराव यांनी आपले विचार मांडताना सांगितले –
“धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. महिलांच्या माध्यमातून संपूर्ण कुटुंबात धम्माचे मूल्य आणि सम्यक विचार रुजतात. रणवरे कुटुंबाचे योगदान चळवळीशी पूर्वीपासून निगडित असून त्यांच्या नेतृत्वाखाली फलटण तालुका शाखा निश्चितच अधिक सक्षम बनेल. भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने आपल्या संपूर्ण महिला कार्यकारिणीला सहकार्य राहील. तुम्हाला व तुमच्या संपूर्ण कार्यकारणीला मनःपूर्वक शुभेच्छा देतो.”
राज्य संघटक व पुणे-सातारा प्रभारी, समता सैनिक दल असिस्टंट स्टाफ ऑफिसर आयु. दादासाहेब भोसले यांनी सांगितले –
“आयु. रंजना रणवरे या धम्मनिष्ठ, समर्पित व कार्यक्षम कार्यकर्त्या आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे फलटण तालुक्यात बौद्ध धम्माच्या प्रचार–प्रसाराला नवे बळ मिळेल. रणवरे कुटुंब तन, मन, धनाने चळवळीला सदैव सहकार्य करीत राहील.”
आपल्या सत्काराला उत्तर देताना आयु. रंजना रणवरे म्हणाल्या –
“फलटण तालुका महिला शाखेच्या माध्यमातून महिलांना चळवळीतील ‘धम्मदूत’ म्हणून सक्रिय करण्याचा मी संकल्प व्यक्त करते. धम्म, शिक्षण, समता आणि संघटन या चार स्तंभांवर आधारित कार्य अधिक दृढ करण्याचा माझा निर्धार आहे. मी अध्यक्ष झाले असले तरी आपण सर्वजण समान आहोत; एकत्रितपणे धर्माचा प्रचार–प्रसार करूया. माझ्या कुटुंबाचा हेतू कोणत्याही स्वरूपाचा मोठेपणा मिरवणे हा नसून धम्म कार्याला गतिमान करण्याचा विचार आहे. तेव्हा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेची मला मदत निश्चितच त्या दिशेने घेऊन जाण्यासाठी उपयोगी पडेल.”
या प्रसंगी प्रमुख उपस्थिती आयु. दादासाहेब भोसले सर(राज्य संघटक व पुणे-सातारा प्रभारी, समता सैनिक दल), आयु. महावीर भालेराव सर(तालुकाध्यक्ष, भा.बौ.म. शाखा फलटण), आयु. बाबासाहेब जगताप सर (महासचिव), आयु. विठ्ठल निकाळजे सर (कोषाध्यक्ष), आयु. रामचंद्र मोरे सर (प्रचार व पर्यटन विभाग उपाध्यक्ष), आयु. बजीरंग गायकवाड सर (संस्कार सचिव), ज्येष्ठ मार्गदर्शक लक्ष्मण निकाळजे सर, प्रवचनकार सोमीनाथ घोरपडे सर, संघटक आयु.आनंद जगताप सर, राजकुमार रणवरे सर, बनसोडे साहेब व रणवरे कुटुंबीय उपस्थित होते.
या छोटेखानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका शाखेचे संस्कार सचिव आयु.बजीरंग गायकवाड यांनी केले.
फलटण तालुका शाखेच्या वतीने महिलांना “धम्मदूत” म्हणून सक्रिय करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. महिला कार्यकारिणीच्या माध्यमातून धम्म, शिक्षण, समता आणि संघटन या चार स्तंभांवर आधारित कार्य पुढे नेण्याचा निर्धार भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेच्या वतीने या प्रसंगी घेण्यात आला.







