
फलटण शहरातील महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी येत्या काही दिवसांत महत्त्वपूर्ण निर्णय राबवण्यात येणार असल्याची माहिती फलटण नगरपालिकेचे नूतन नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली. महिलांसाठी मोफत बस सेवा, शहरातील चौका-चौकात सीसीटीव्ही कॅमेरे, तसेच प्रमुख ठिकाणी स्वच्छ व अत्याधुनिक शौचालये उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील अनेक ठिकाणी झालेली अतिक्रमणे हटवून चौक प्रशस्त करण्यात येणार असून, सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून महिलांसाठी स्वतंत्र शौचालयांचा प्रश्न प्रलंबित असल्याने येत्या दोन ते तीन महिन्यांत शहरातील प्रमुख ठिकाणी शौचालयांची उभारणी करण्यात येईल, ती अत्याधुनिक व स्वच्छ असतील, असे त्यांनी सांगितले.
यापूर्वी मागील नगरपालिकेच्या काळात सद्गुरु उद्योग समूह व महाराजा उद्योग समूह यांच्या सहकार्याने महिलांसाठी मोफत बस सेवा सुरू करण्याचा ठराव स्थगित ठेवण्यात आला होता. मात्र आता संबंधित संस्थांशी चर्चा करून महिला व मुलींसाठी मोफत बस सेवा निश्चितपणे सुरू केली जाईल, अशी ग्वाही नगराध्यक्षांनी दिली.
पाणीपुरवठ्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, शहरातील अनेक भागांत कमी दाबाने व अस्वच्छ पाणीपुरवठा होत होता. ही समस्या सोडवण्यासाठी नव्या पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असून लवकरच संपूर्ण शहराला योग्य दाबाने १००% शुद्ध पाणी मिळणार आहे.
रस्त्यांच्या दुरवस्थेवर भाष्य करताना त्यांनी शहरातील सर्व मध्यवर्ती रस्ते सिमेंटचे करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. येत्या सहा ते आठ महिन्यांत खड्डेमुक्त फलटण पाहायला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नगरपालिकेच्या सेतूमधील दाखले व कर भरण्याच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणून, बाहेरगावी राहणाऱ्या नागरिकांसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. नागरिकांनी भरलेल्या कराचा वापर १००% विकासकामांसाठीच केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दर रविवारी भरणारा आठवडी बाजार एकाच ठिकाणी भरवून तेथे सर्व आवश्यक सुविधा देण्यात येणार आहेत.








