
बारामती : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ आज श्री क्षेत्र कन्हेरी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झाला. मात्र या जाहीर सभेत माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे दोन संचालक गैरहजर असल्याचं लक्षात येताच अजित पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
“पदं हवी असतात तेव्हा सतत मागे लागता आणि आता असं वागता? हे मला अजिबात चालणार नाही,” अशा कडक शब्दांत त्यांनी संबंधित संचालकांची कानउघडणी केली. ते नेमके कुठे आहेत? अशी विचारणा करत त्यांनी उद्याच दोघांना भेटीसाठी बोलावण्याचा स्पष्ट आदेशही दिला.
यावेळी अजित पवार म्हणाले, “सर्वसामान्य जनता माझ्यासोबत आहे. काही पदाधिकारी वेगळ्या भूमिका घेत असतील तर त्याचा मला फरक पडत नाही. मात्र विनाकारण उघडं पडू नका,” असा गर्भित इशाराही त्यांनी दिला.
तब्बल नऊ वर्षांनंतर होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यात राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी चढाओढ होती. मात्र अपवाद वगळता अजित पवार यांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याने अनेक इच्छुक नाराज झाले होते. याच नाराजीतून काहींनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याचं चित्र होतं.
हीच अंतर्गत नाराजी ओळखून अजित पवार यांनी जाहीर सभेत थेट आणि आक्रमक भूमिका घेत पदाधिकाऱ्यांना शिस्तीचा इशारा दिला. त्यांच्या या ठाम पवित्र्यानंतर पक्षातील नाराज इच्छुकांनी आपसूकच तलवार म्यान केल्याचं बोललं जात असून राष्ट्रवादीत पुन्हा एकदा एकसंघतेचा सूर दिसू लागला आहे.






