बौद्धांनी बौद्ध धम्माचे आचरण केले तर प्रगतीची कवाडे लवकर उघडतील – भीमराव लोंढे

0
77
बौद्धांनी बौद्ध धम्माचे आचरण केले तर प्रगतीची कवाडे लवकर उघडतील – भीमराव लोंढे

बौद्धांनी बौद्ध धम्माचे आचरण केले तर प्रगतीची कवाडे लवकर उघडतील – भीमराव लोंढे

फलटण : बौद्धांनी जर खऱ्या अर्थाने धम्माचे आचरण केले तर प्रगतीची कवाडे लवकर उघडतील.आपण त्याच मार्गाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करु त्यासाठी बौद्धांनी आचरणाने आपले जीवन सुखी केले पाहिजे. कारण बुद्धाचा धम्म कर्मकांडावर नाही तर आचरणावर आधारित आहे.’आचरणो परमो धम्मो।। धम्म हा आचरणात असावा असे सुंदर पद्धतीने मार्गदर्शन आयु भिमराव लोंढे सर यांनी केले ते भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचे पुष्प 13 वे पुष्प मौजे दुधेबावी या ठिकाणी गुंफताना ‘बौद्धांची आचार संहिता’ या विषयावर बोलत होते.
प्रवचनकार म्हणून लाभलेले आयु भिमराव लोंढे सर तालुका संघटक यांनी उपस्थितांना छान पद्धतीने मार्गदर्शन केले. वर्षावास प्रवचन मालिकेतील या कार्यक्रमाचे आयोजन पंचशील मित्र मंडळ दुधेबावी च्या सहकार्याने दुधेबावी येथील बुद्ध विहारात संपन्न झाले. याप्रसंगी उपस्थित असणारे भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हाचे प्रभारी व राज्याचे संघटक तसेच फलटण तालुक्याचे मार्गदर्शक गुरुवर्य आयु दादासाहेब भोसले उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात फलटण तालुक्याचे कोषाध्यक्ष आयु विठ्ठल निकाळजे सर यांनी धम्म आचरण करुन नीतिमान जीवन जगण्याचे आव्हान केले.आयु.दादासाहेब भोसले यांनी समता सैनिक दलाच्या माध्यमातून सैनिक शिबिराचा आयोजन करण्याची सूचना दिली.तसेच ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे वाचन या विहारात करण्यास सुरवात करावी असे सांगितले.अशा पद्धतीने वर्षावास प्रवचन मालिका फलटण तालुक्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने अतिशय सुंदर पद्धतीने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत सुरु राहणार आहे.

यावेळी फलटण तालुक्याचे भूषण ॲडिशनल कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स, मुंबई आयु-तुषार मोहिते यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील प्रत्येक गावासाठी ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथ दुधेबावी गावच्या बौद्ध उपासक उपासिकाना भेट देण्यात आला. त्यासोबत उपस्थितांना तालुका शाखेच्या वतीने संविधान प्रस्ताविकेचे व संस्कार विभागामार्फत सूत्रपठन पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.