फलटण ( साहस Times) –राजकीय संघर्षाच्या अखेरच्या टप्प्यावर दिसणारे सौजन्याचे शब्द, पण त्यामागे लपलेली सूचनांची धार… अशी काहीशी परिस्थिती माण मतदारसंघात दिसून येतेय. रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यात गेल्या काही वर्षांपासून सुरू
असलेला संघर्ष पुन्हा एकदा जनतेपुढे आला आहे.
कोळकी (फलटण) येथे पार पडलेल्या एका विकासकामाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलताना रामराजेंनी जयकुमार गोरे यांना चक्क “शुभेच्छा” दिल्या, पण त्याच वेळी सत्तेचा गरिबांसाठी वापर करण्याचे सुचनाही त्यांनी दिलं. “माझं वय झालंय, सांगण्याचा मला अधिकार आहे…” असे सांगत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
गोरे यांच्यावर नाव न घेता उत्तर
जयकुमार गोरे यांनी काही दिवसांपूर्वी रामराजेंवर जहरी टीका करत “देवेंद्र पावले म्हणून जेलमध्ये गेला नाही… सुधरा, नीट वागा,” असे वक्तव्य केले होते. त्याला उत्तर देताना रामराजेंनी नम्र पण सूचक पद्धतीने सांगितले – “माझ्या तोंडाला सेन्सॉरशिप लावली आहे. ती योग्य वेळी काढेन.”
रणजीतसिंह नाईक निंबाळकरांवर बोचरी टीका
रामराजे नाईक निंबाळकरांनी नाव न घेता माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यावरही घणाघात केला.
“पैसे खायचे त्यांना खाऊ द्या, त्यांना जुलाब लागतील. पिसाळलेली कुत्री गेली – त्यांचं नाव स्टेजवर घेऊ नका,” असे म्हणत त्यांनी शब्दांचा कडवटपणा दाखवला.
“धोम बलकवडी नसतानाचे दिवस माहित नाहीत आता कोणाला… हे दहशतीचे दिवस आहेत. पोलीस काय करतात हे माहित आहे, आणि कोणी खून केला हेही मला माहित आहे, पण मी आत्ता काही बोलणार नाही.”
“सत्तेचा चांगला वापर करा” – गोरे यांना सल्ला
“जयकुमार गोरे आणि माझं वैयक्तिक काही नाही. देव त्यांना सद्बुद्धी देवो. ते मंत्री व्हावेत, संत्री व्हावेत पण गरिबांसाठी काम करावं. सत्तेचा वापर चांगल्या कार्यासाठी करावा,” असा सल्ला त्यांनी दिला.
कार्यक्रमाऐवजी मॅच बघायची होती
आपल्या खास शैलीत त्यांनी सांगितले – “मला कार्यक्रमाला यायचा मूड नव्हता, मॅच बघायची होती. मी रम्मी नाही बघत, मॅच बघतो…” असा टोलाही कृषीमंत्री यांच्याकडे वळवला.