उपोषण हे ‘राजकीय स्टंट’; बाजार समिती सभापतींचा घणाघात

0
19
उपोषण हे ‘राजकीय स्टंट’; बाजार समिती सभापतींचा घणाघात

➤ २८ ऑक्टोबरला पुण्यात चर्चेसाठी बैठक बोलावलेली असतानाही उपोषणाची भूमिका बेकायदेशीर – श्रीमंत रघुनाथराजे यांचा आरोप

फलटण,फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळे भाडेवाढीविरोधात काही व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या उपोषणावर सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी तीव्र शब्दात टीका केली आहे. आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे उपोषण ‘राजकीय स्टंट’ असून, संस्थेची बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप कागदपत्रांसह केला.

श्रीमंत रघुनाथराजे म्हणाले, “पणन मंत्री जयकुमार रावळ यांच्या सूचनेनुसार, भाडेवाढीबाबत चर्चा करण्यासाठी २८ ऑक्टोबर रोजी पुण्यात सर्व संबंधित घटकांची बैठक पणन संचालकांनी बोलावलेली आहे. असे असताना उपोषण करणे हे केवळ संस्थेवर बेकायदेशीर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे.”

📁 उपोषणकर्त्यांचा बाजार समितीशी थेट संबंध नाही – सभापतींचा दावा

यावेळी त्यांनी उपोषणामागील व्यक्तींची पार्श्वभूमी उघड करताना सांगितले, “उपोषणाचे नेतृत्व करणाऱ्यांचा बाजार समितीत एकही गाळा नाही, तसेच ते मूळचे फलटणचे रहिवासीदेखील नाहीत. बहुसंख्य गाळेधारकांनी भाडेवाढीचे करार मान्य केल्याची फाईल आमच्याकडे आहे. हा प्रकार पूर्णपणे राजकीय हेतूने केला जात आहे.”

🏗️ ‘माणुसकी दाखवली, तरीही आंदोलन’

सभापती श्रीमंत रघुनाथराजे यांनी यावेळी अनेक गाळे अनधिकृतपणे उभारण्यात आले असल्याचेही निदर्शनास आणून दिले. त्यांनी सांगितले, “काही गाळे तर बाजाराच्या प्रवेशद्वारावर आणि जनावरांच्या बाजारात बांधले आहेत. आम्ही कठोर कारवाई करू शकलो असतो, मात्र कोणाचाही संसार उद्ध्वस्त होऊ नये म्हणून माणुसकी दाखवली. आम्ही कोणाचेही वैरी नाही.”

🌾 ‘शेतकऱ्यांच्या हितासाठी उत्पन्न वाढ आवश्यक’

ते पुढे म्हणाले, “बाजार समितीला शासनाकडून कोणतेही अनुदान मिळत नाही. त्यामुळे संस्थेचा विकास आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी उत्पन्न वाढवणे गरजेचे आहे. आम्ही वरच्या मजल्यावर ‘अॅग्रीकल्चरल इन्फॉर्मेशन ट्रान्सक्रिप्शन हॉल’ उभारत आहोत. यामध्ये शेतकऱ्यांना निर्यातीचे आणि आधुनिक शेतीचे प्रशिक्षण दिले जाईल.”

“विकास करायचा की राजकारणात अडकायचं?”

शेवटी श्रीमंत रघुनाथराजे यांनी सवाल केला की, “संस्थेच्या विकासासाठी काम करायचे की अशा राजकीय दबावाला बळी पडायचे?”

.