निंबूत ( साहस Times ): निराशिवतक्रार ग्रामपंचायतीच्या वतीने आज लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने निंबूत येथील बबई केरबा बनसोडे यांना त्यांच्या सामाजिक आणि साहित्य वाचन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सुनील अण्णा पाटोळे स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
बबई बनसोडे यांनी आतापर्यंत २५० हून अधिक पुस्तके वाचली आहेत. विशेष म्हणजे ८० वर्षांहून अधिक वय असूनही त्या चष्म्याविना वाचन करतात. त्यांची ही साहित्यप्रेमाची जिद्द कौतुकास्पद आहे.
त्यांचा जन्म फलटण तालुक्यातील कांबळेश्वर येथे झाला. लग्नानंतर त्या निंबूत येथे बनसोडे कुटुंबात सून म्हणून आल्या. शेतीप्रेमी असलेल्या आणि जुन्या सातवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या बबई आजींचा वाचनाशी दृढ संबंध निर्माण झाला. महापुरुषांचे विचार, कादंबऱ्या, सामाजिक वाड्मय यांचे वाचन त्या सातत्याने करतात.
यापूर्वी निरे येथील युवा कार्यकर्ते स्व. सुनील अण्णा पाटोळे यांनी ११ वर्षांपूर्वी आपल्या घरी अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्याची सुरुवात केली होती. त्यांचे मागील वर्षी अचानक निधन झाले. त्यांच्या कार्याचा वारसा जपण्यासाठी दादासाहेब गायकवाड, कांताभाऊ राखपसरे आणि मित्रपरिवाराने त्यांच्या स्मरणार्थ पुरस्कार सुरू केला.
या कार्यक्रमात निरे ग्रामपंचायतीच्या सरपंच तेजश्रीताई काकडे, उपसरपंच राजेशभाऊ काकडे, सदस्य अनिलअण्णा चव्हाण, राधाताई माने, सुनीलप्पा चव्हाण, आंनता शिंदे, अभि भालेराव, तसेच दादासाहेब गायकवाड, अमोल साबळे, कांताभाऊ राखपसरे, भिवा वळकुंदे, अजितदादा जैन, टी. के. जगताप, महेश जेधे, बनसोडे परिवार व असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक, अण्णाभाऊ साठे आणि भारतीय संविधान यांच्या पूजनाने करण्यात आली.