Monday, September 14, 2026
Homeसाताराहॉटेलमध्ये तंदुर थाळीच्या ऑर्डरवरून वादाचा रक्तरंजित शेवट, कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

हॉटेलमध्ये तंदुर थाळीच्या ऑर्डरवरून वादाचा रक्तरंजित शेवट, कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

फलटण :  तालुक्यातील कोळकी गावात १२ सप्टेंबर २०२४ रोजी एक धक्कादायक घटना घडली. दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास कोळकी येथील हॉटेल आमंत्रणमध्ये अमोल वनारे (वय २८, रा. कोळकी) आणि त्याचा मित्र सलमान रफीक शेख (रा. सोनवडी) हे दोघे जेवणाचे पार्सल घेण्यासाठी आले होते. अमोलने चिकन तंदुर थाळी, ५ रोटी आणि २ भाकरी घेण्यासाठी ऑर्डर दिली.

ऑर्डर तयार करण्यासाठी हॉटेल मॅनेजर अक्षय भालचंद्र काळे (वय ३२) यांनी कामगार विपूल उर्फ डॉन मुर्म (रा. उडीसा) याला कागद आणण्यासाठी सांगितले. मात्र विपूलने ते दुर्लक्ष केल्याने अमोल वनारेने त्याच्या डोक्यात टपली मारली. यावरून वाद सुरू झाला आणि थेट झटापटीत बदलला. सलमान शेखने देखील विपूलला मारहाण केली.

वाद इतका वाढला की अमोलने हॉटेलमधील लोखंडी सळई घेऊन विपूलच्या डोक्यात आणि शरीरावर वार केले. त्यामुळे विपूल गंभीर जखमी झाला आणि तातडीने त्याला कोळकी येथील जीवनज्योती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती अधिक खालावल्याने त्याला पुढील उपचारासाठी पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये नेले असता, त्याच्या उपचाराला सुरुवात होण्याआधीच त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांना सूचित करण्यात आले. त्यांनी त्वरित कारवाई करत सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे, पोलीस उपनिरीक्षक सुरज शिंदे, मृगदीप गायकवाड आणि इतर पोलिसांचे तीन पथक तयार केले.

सपोनि. नितीन शिंदे पुणे येथे तपासासाठी रवाना झाले, तर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी हॉटेल आमंत्रणमध्ये घटनास्थळी भेट दिली. दोन्ही आरोपींवर कसून चौकशी सुरू असून, गुन्ह्याच्या तपासात पोलीस हवालदार चंद्रकांत थापते, सचिन जगताप, बापूराव धायगुडे, नाना होले, मल्हारी भिसे, महिला पो.ना. हेमा पवार, पोलीस शिपाई स्वप्नील खराडे, अतुल बढे, महेश जगदाळे, अनिल देशमुख व इतर पोलीस अधिकारी सहभागी झाले आहेत.

विपूल उर्फ डॉन मुर्म हा मूळचा उडीसाचा रहिवासी असून, त्याच्या ओळखीबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे. या हृदयद्रावक घटनेने कोळकी गावात एकच खळबळ उडाली असून, घटनेनंतर हॉटेल बंद ठेवण्यात आले आहे. गुन्ह्याचा तपास जलदगतीने होऊन आरोपींवर योग्य कारवाई होण्याची अपेक्षा आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments