
फलटण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज फलटण तालुक्यात विविध विकासकामांचा भव्य ई-भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी त्यांनी निरा-देवघर सिंचन योजनेच्या दुसऱ्या टप्यासह सुमारे ९६७ कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ केला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “ज्या निरा-देवघरच्या पाण्याबद्दल हे अशक्य आहे, असे सांगितले जात होते, ते आम्ही करून दाखवले आहे. माझा जन्मच दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी झाला आहे.” फलटण तालुक्याच्या इतिहासातील सर्व विक्रम मोडीत काढणाऱ्या तब्बल ७० ते ७५ हजार नागरिकांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या पटांगणावर झालेल्या सभेत त्यांनी विकासाची ग्वाही दिली.
कार्यक्रमास जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार राहुल कुल, आमदार महेश शिंदे, आमदार अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, आमदार राम सातपुते यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक करून विकासकामांची माहिती दिली. यामध्ये मुख्यत्वे निरा-देवघर प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा समावेश असून, फलटण, खंडाळा आणि माळशिरस या तालुक्यांमधील सुमारे १२,९७० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. यासोबतच नूतन प्रशासकीय इमारत, महसूल भवन, फलटण शहर, फलटण ग्रामीण व वाठार येथील सुसज्ज पोलीस ठाण्यांचे लोकार्पण, पालखी मार्गाचे काम आणि पंतप्रधान ग्राम सडक योजनेतील रस्त्यांचे भूमिपूजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी फलटण येथील तरुण डॉक्टर संपदा मुंडे यांच्या दुर्दैवी मृत्यूवर शोक व्यक्त करत तात्काळ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती दिली. त्यांनी विरोधकांवर टीका करत म्हटले, “या प्रकरणात काहीही कारण नसताना रणजितदादा आणि सचिनदादांचे नाव गोवण्याचा प्रयत्न झाला. अशा प्रकारे प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे राजकारण कोणी करत असेल, तर तेही मी सहन करणार नाही.”
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे ११ नव्या मागण्यांचे निवेदन दिले, ज्यावर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ निर्णय घेत घोषणांचा पाऊस पाडला. यामध्ये पाडेगाव-शिंगणापूर रस्ता, नाईकबोमवाडी MIDC प्रकल्प, फलटण एअरपोर्टसाठी सर्वेक्षण, उपसा सिंचन योजना, शासकीय रुग्णालयाची श्रेणीवर्धन व नवी इमारत व यंत्रसामुग्री यांचा समावेश होता.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजकीय भाषणात राज्यातील लोकप्रिय योजना ‘लाडकी बहीण’ सुरू राहतील याची खात्री दिली. त्यांनी शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षे वीज बिल माफ आणि दिवसा १२ तास मोफत सौर वीज देण्याची घोषणा केली.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्र्यांना ‘आधुनिक भगीरथ’ म्हणत गौरव दिला. माजी खासदार रणजितसिंह नाईक यांनी फलटणच्या ७० वर्षांच्या पाणी संघर्षावर मुख्यमंत्र्यांनी न्याय दिल्याचे सांगितले. आमदार सचिन पाटील यांनी उत्तर कोरेगावमधील २६ गावांना पाणी पुरवठ्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.
कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांचे लाभार्थ्यांना मानपत्र व लाभाचे प्रतीकात्मक वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार सातारा जिल्हा बँकेचे संचालक शिवरूपराजे खर्डेकर यांनी मानले.








