गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट – ३० वर्षांचा यशस्वी प्रवास!

0
71
गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट – ३० वर्षांचा यशस्वी प्रवास!

फलटण –३० वर्षांचा टप्पा पार करत आघाडीचा ब्रँड ठरलेला गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट आता आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेण्यास सज्ज असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

आनंत मंगल कार्यालय, कोळकी, फलटण येथे आयोजित ‘उत्सव ३० वर्षांचा’ या भव्य कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी गोविंदचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, संचालिका श्रीमंत शिवांजलीराजे, श्रीमंत सत्यजितराजे, सीईओ धर्मेंद्र भल्ला, अभिनेते समीर चौघुले यांच्यासह फलटण तालुक्यातील मान्यवर व हजारो दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

श्रीमंत रामराजे यांनी सांगितले की, “संजीवराजे, शिवांजलीराजे व सत्यजितराजे यांच्या अथक परिश्रमामुळे छोट्या रोपट्याचे आज भव्य वृक्षात रूपांतर झाले असून, दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देत ग्राहकांना दर्जेदार दुग्धजन्य पदार्थ पोहोचवण्याचे कार्य गोविंदने प्रामाणिकपणे केले आहे.”

संजीवराजे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, २००-२५० लिटरपासून सुरू झालेला प्रवास आज देशातील आघाडीच्या दुग्ध व्यवसायापर्यंत पोहोचला आहे. शेतकऱ्यांना योग्य दर देणे, उत्तम खाद्य पुरवणे, उच्च दर्जाची दुधाची भुकटी व विविध दुग्धजन्य पदार्थ तयार करून ती ग्राहकांपर्यंत पोहोचवणे – या तत्त्वामुळेच गोविंद आज प्रत्येक घराघरात पोहोचला आहे.

या कार्यक्रमात डॉ. गणेश सपकाळ यांनी प्रास्ताविक केले तर सीईओ धर्मेंद्र भल्ला यांनी आभार मानले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. दूध उत्पादक व शेतकऱ्यांच्या मोठ्या उपस्थितीने कार्यक्रमाला उत्साहवर्धक वातावरण लाभले.