
काही दिवसापूर्वी अधिकाऱ्यांच्या वेतनावरून अजित पवारांनी भाष्य करत कंत्राटी पद्धतीने अधिकारी भरतीचे संकेत दिले होते. आता सरकारकडून तशी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करत आक्रमक भूमिका घेतली आहे. नाना पटोले यांनी म्हटले आहे की, शेतकरी, कामगार, कष्टकरी, नोकरदार, छोटे व्यापारी यांचे आयुष्य उद्ध्वस्थ केल्यानंतर आता अधिकाऱ्यांची पदे कंत्राटी पद्धतीने भरून स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या तरुणांचे भविष्य उद्धवस्त करण्याचा विडा राज्य सरकारने उचलला आहे. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसिलदार व नायब तहसिलदार पदेही कंत्राटी पद्धतीने भरण्याची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही जाहिरात तात्काळ रद्द करुन सरकारने नोकर भरतीसंदर्भात स्पष्ट भूमिका मांडावी अन्यथा तरुणांच्या हितासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरेल.






