फलटण (साहस Times ) : आर्थिक अडचणींमुळे मालमत्ता कर भरणे थकीत राहिलेल्या नागरिकांसाठी शासनाने दिलासा देणारी अभय योजना जाहीर केली आहे. या योजनेच्या माध्यमातून थकीत मालमत्ता करावरील दंड व व्याजाच्या रकमेवर ५० टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे. त्यामुळे करदात्यांनी संधीचे सोने करत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी केले आहे.
मोरे म्हणाले की, कर वेळेवर न भरल्यास दरमहा दोन टक्के दंड आकारला जातो. त्यामुळे मूळ कर रकमेपेक्षा दंड आणि व्याजाची रक्कम अधिक होऊन नागरिकांच्या एकूण थकबाकीत भर पडते. याचा परिणाम नगरपालिकेच्या कर वसुलीवर आणि नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा-सेवांवर होतो.
अभय योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये:
- मालमत्ता करावरील दंड व व्याजावर ५०% माफी
- माफीचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज आवश्यक
- दंड व व्याज वगळता शिल्लक कराची संपूर्ण रक्कम भरणे बंधनकारक
- काही प्रकरणांमध्ये ५०% पेक्षा अधिक सूट मिळू शकते
- लाभ केवळ एकदाच घेता येणार
- मर्यादित कालावधीसाठी योजना लागू
मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तातडीने फलटण नगरपालिकेच्या कर विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही मुख्याधिकारी मोरे यांनी केले.