
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास ठाण्यातील नौपाडा येथील भास्कर कॉलनी परिसरात काही लोकांना दुर्मिळ सोनेरी कोल्ह्याचं दर्शन झालं. या घटनेची माहिती कळताच वाइल्डलाइफ वेल्फेअर असोसिएशनचे स्वयंसेवक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर स्वयंसेवकांनी रेस्क्यू करत सोनेरी कोल्ह्याला जेरबंद केलं आहे. नर जातीचा सोनेरी कोल्हा जेरबंद करण्यात आला असून त्याची सर्वप्रथम वैद्यकीय चाचणी केली जाणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर त्याला ठाण्याजवळील जंगलात सुखरुप सोडलं जाणार असल्याचं वाइल्डलाइफ वेल्फेअर असोसिएशनकडून सांगण्यात आलं आहे. यावेळी सोनेरी कोल्ह्याला पाहण्यासाठी नौपाड्यातील शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती.





