
या दुर्घटनेचा आढावा घेतल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले की, घाटकोपर भागात झालेली ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेची माहिती मिळताच महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना बचावकार्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत अनेक जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. सदर होर्डिंग अनधिकृत होते की नाही, याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. जर हे होर्डिंग अनधिकृत असेल तर होर्डिंग मालकावर कारवाई केली जाईल. तसंच वादळ-वाऱ्यात होर्डिंग कोसळू नये म्हणून शहरातील सर्व होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना मी आयुक्तांना दिल्या आहेत. ठरवून दिलेल्या आकारापेक्षा मोठे होर्डिंग लावू नयेत, महापालिकेचा परवाना असल्याशिवाय अशी होर्डिंग उभारली जाऊ नयेत, यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आली आहे.





