अशोका विजयादशमीपासून आंबेडकरांच्या धम्मचक्र प्रवर्तनापर्यंत : मानवमुक्तीची ऐतिहासिक परंपरा

0
91
अशोका विजयादशमीपासून आंबेडकरांच्या धम्मचक्र प्रवर्तनापर्यंत : मानवमुक्तीची ऐतिहासिक परंपरा

अशोका विजयादशमीपासून आंबेडकरांच्या धम्मचक्र प्रवर्तनापर्यंत : मानवमुक्तीची ऐतिहासिक परंपरा
फलटण | प्रतिनिधी :-  भारतीय इतिहासात सम्राट अशोक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महान व्यक्तिमत्त्वांनी बौद्ध धम्माला वेगवेगळ्या युगांत नवा जन्म दिला. कलिंगयुद्धानंतर अशोकाने बौद्ध धम्म स्वीकारून राज्यव्यवस्था लोककल्याणकारी केली. तर 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह धम्मचक्र प्रवर्तन करून आधुनिक भारतात सामाजिक व सांस्कृतिक क्रांती घडवली.
अशोकाचे शिलालेख : प्रजेच्या हिताची राजाज्ञा
इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात उभारलेल्या अशोक स्तंभांवर कोरलेल्या शिलालेखांत त्याने स्पष्ट केले :
“सर्व जीवांना आदर द्या, करुणा दाखवा.”
“धर्म म्हणजे अहिंसा, सत्य, शुचिता व संयम.”
“जातीपातीत श्रेष्ठता नसून गुणांच्या आधाराने मनुष्य श्रेष्ठ.”
कलिंगयुद्धातील रक्तपात पाहून अशोकाने युद्धत्याग केला आणि धम्मतत्त्वांवर आधारित लोकनीती स्वीकारली. “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” हा संदेश त्याने शिलालेखातून दिला.
विजयादशमी : अशोका विजयादशमीचा वारसा भंते निग्रोध यांच्या उपदेशानंतर अश्विन शुद्ध दशमीला अशोकाने भंते उपगुप्त यांच्या हस्ते बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यावेळी धम्मचक्र प्रवर्तनाचा संकल्प जाहीर करून दहा कलमी लोकनीती प्रजेस दिली.त्याला ‘दशहरा’ या नावाने संबोधले जात होते. पुढे या परंपरेतून ‘दशहरा’ या शब्दाचा अपभ्रंश होऊन“दसरा” हा शब्द प्रचलित केला गेला.
दीपोत्सवाचा बौद्ध संदर्भ
गौतम बुद्ध कपिलवस्तूला परतले तेव्हा शाक्य लोकांनी लाखो दिव्यांनी त्यांचे स्वागत केले. त्या दिवशी बुद्धांनी शिष्यांना “अप्प दीपो भव” — “स्वतःच स्वतःचा प्रकाश बना” — हा संदेश दिला.सम्राट अशोकाने पुढे ८४ हजार स्तूपांची उभारणी करून कार्तिक अमावास्येला दीपदानाची परंपरा सुरू केली. त्यामुळे आजची दिवाळी बौद्ध परंपरेत अज्ञानावर ज्ञानाचा व अन्यायावर करुणेचा विजय म्हणून स्मरणात आहे.त्याला सनातनी मनुवाद्यांनी विकृत बनवले.
आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदा : अशोक व आंबेडकरांचे स्थान
इ.स.पूर्व ३रा शतक : पाटलीपुत्र येथे झालेल्या तिसऱ्या बौद्ध संगीतीस अशोकाने राजाश्रय दिला. त्यातून धम्म प्रचारकांना श्रीलंका, म्यानमार, थायलंड, चीन इथपर्यंत धम्मप्रसारासाठी पाठवले गेले.
१९५४, रंगून (बर्मा) : आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेत डॉ. आंबेडकर यांनी “बुद्ध आणि त्यांचा धम्म हा मानवतेचा शाश्वत मार्ग आहे” असे प्रतिपादन केले.
१९५६, भारत : बुद्ध जयंतीनिमित्त नवी दिल्ली व बोधगया येथे आंतरराष्ट्रीय बौद्ध संमेलन झाले. यात बाबासाहेबांनी भारतीय समाजासाठी बौद्ध धम्म स्वीकारण्याचा दृढ निश्चय सार्वजनिक केला.
नागपूरचे धम्मचक्र प्रवर्तन : आधुनिक भारताची क्रांती
14 ऑक्टोबर 1956 हा दिवस भारतीय इतिहासातील ऐतिहासिक वळण आहे. नाग नदीच्या तीरावर वसलेल्या प्राचीन नाग लोकांच्या नगरीत नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह बौद्ध दीक्षा घेतली.या वेळी त्यांनी २२ प्रतिज्ञा देऊन जातिव्यवस्था व ब्राह्मणवादी धार्मिक विधी नाकारले, करुणा, समता व विवेकाधारित जीवनमूल्यांचा स्वीकार केला.
डॉ. आंबेडकरांनी लाखो अनुयायांना २२ प्रतिज्ञा दिल्या.
आंबेडकरांनी दिलेल्या प्रतिज्ञा अशा आहेत:

  1. मी ब्रह्मा, विष्णू, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
  2. मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
  3. मी गौरी-गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव-देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
  4. देवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास नाही.
  5. गौतम बुद्ध हा विष्णूचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसळ प्रचार होय असे मी मानतो.
  6. मी श्राद्धपक्ष करणार नाही; पिंडदान करणार नाही.
  7. मी बौद्धधम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही.
  8. मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाचे हातून करवून घेणार नाही.
  9. सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो.
  10. मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन.
  11. मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन.
  12. तथागताने सांगितलेल्या दहा पारमिता मी पाळीन.
  13. मी सर्व प्राणिमात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन.
  14. मी चोरी करणार नाही.
  15. मी व्याभिचार करणार नाही.
  16. मी खोटे बोलणार नाही.
  17. मी दारू पिणार नाही.
  18. ज्ञान (प्रज्ञा), शील, करुणा या बौद्धधम्माच्या तीन तत्त्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन.
    19.माझ्या जुन्या, मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बौद्धधम्माचा स्वीकार करतो.
  19. तोच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.
    21.आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो.
  20. इतःपर मी बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो.
    या प्रतिज्ञांनी भारतीय समाजाच्या चेतनेत अमूलाग्र बदल घडवला.

सम्राट अशोकाने आपल्या काळात धम्मावर आधारित राज्यनीती दिली, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आधुनिक भारतात धम्मावर आधारित लोकशाही समाजाची पायाभरणी केली. अशोका विजयादशमीपासून आंबेडकरांच्या धम्मचक्र प्रवर्तनापर्यंतची ही परंपरा भारतीय समाजाला अन्याय, विषमता व अंधकारातून मुक्त करणारी ठरली आहे.
आजचा धम्मचक्र प्रवर्तन दिन हा केवळ बौद्ध सण नाही; तो मानवमुक्तीचा जागतिक उत्सव आहे. 69 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांनाच मंगलमय हार्दिक शुभेच्छा!💐💐💐

आयु. सोमीनाथ पोपट घोरपडे, सामाजिक कार्यकर्ता
मु. पो सासकल ता. फलटण जि. सातारा
मोबाईल नं. 9284658690