
पुणे –दरवर्षी १४ एप्रिलला संपूर्ण देशात आणि जगभरात ‘भीम जयंती’ साजरी केली जाते. पांढरे शुभ्र कपडे, निळा झेंडा आणि ‘जय भीम’च्या घोषणा हे दृश्य कुठेही दिसले, की समजायचं – बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस साजरा होतोय. पण ही परंपरा नेमकी कधी आणि कुठे सुरू झाली, याबाबत फारच थोड्यांना माहिती आहे.
भीमजयंतीची सुरुवात पुण्यातून!
आपल्या देशातील अनेक वैचारिक, सामाजिक, वैज्ञानिक चळवळींची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पुणे शहरातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
ही ऐतिहासिक घडामोड घडवून आणणारे होते थोर समाजसेवक जनार्दन सदाशिव रणपिसे.
रणपिसे यांनी १४ एप्रिल १९२८ रोजी खडकी येथील दलित मंडळाच्या अध्यक्ष म्हणून बाबासाहेबांचा पहिला वाढदिवस साजरा केला. त्यांनी बाबासाहेबांची प्रतिमा हत्तीच्या अंबारीत मिरवली. पुढे प्रभात फिल्म कंपनीच्या रथातून, उंटांवरून मिरवणुका काढून ‘भीम जन्मोत्सव’ला प्रचंड जनाधार मिळवून दिला.
जयंती साजरी करण्याच्या परंपरेचे शिल्पकार
खडकी परिसरातील प्रत्येक वस्तीत ही परंपरा वाढवून, सर्व वस्त्यांचे एकत्रीकरण करत रणपिसेंनी ‘दलित मंडळ’ स्थापन केले. या मंडळामार्फत मोठ्या प्रमाणात जयंती साजरी केली जाऊ लागली.
रणपिसे यांचा सामाजिक प्रवास
२४ ऑगस्ट १८९८ रोजी सासवड येथे जन्मलेले रणपिसे हे त्या काळातील पुणे जिल्ह्यातील पहिले दलित मॅट्रिक पास विद्यार्थी होते. त्यांनी पुढे फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेतले.
१९१८–२१ या काळात त्यांनी ‘सन्मार्ग दर्शक मंडळा’च्या माध्यमातून व्याख्याने, नाटके, प्रौढ शिक्षणवर्ग, व्यायामशाळा यांचे आयोजन करून समाजात जागृती केली.
महार सेवादलाचे कमांडर इन चीफ
रणपिसे यांनी महार सेवादलाची स्थापना करून तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. त्यांनी राजकारणात फारशी चळवळ केली नाही, पण समाजकार्यात त्यांचा मोठा वाटा होता. पुण्यात डॉ. आंबेडकरांना मानपत्र आणि इमारत निधी उभारण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान होते.
इतिहासात उपेक्षित पण प्रभावी योगदान
१९३९ मध्ये कायदे मंडळात निवडून आलेल्या चौदा प्रतिनिधींचे श्रेय देखील रणपिसेंकडे जाते. महात्मा गांधी पुण्यात उपोषणाला बसले असताना बाबासाहेब नॅशनल हॉटेलमध्ये होते. त्यावेळी रणपिसे सरकारी सेवेत असूनही बाबासाहेबांच्या मदतीला धावून गेले.
एक कार्यकर्ता, एक द्रष्टा
रणपिसे हे केवळ एक समाजसेवक नव्हते, तर त्यांनी सामाजिक चळवळींच्या मूळ गाभ्यातून कार्य केले. आज संपूर्ण जगभर साजरी केली जाणारी ‘भीम जयंती’ पुण्यातून, त्यांच्या हस्ते सुरू झाल्याचा इतिहास उजेडात आणणे ही काळाची गरज आहे.
संदर्भ:
मिलिंद मानकर, लेखक – “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींचे संग्राहक”
लोकराज्य मासिकातील विशेष लेख समभार )
)







