
पिंपरी चिंचवड : महाराष्ट्रात सध्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग आरक्षणामुळे अनेक ठिकाणी राजकीय समीकरणांमध्ये बदल होताना दिसत आहेत. काही प्रभागांमध्ये या बदलांमुळे अनिश्चितता निर्माण झाली असली, तरी काही ठिकाणी नागरिकांनी पुढाकार घेत नव्या समीकरणांची जुळवणी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
अशाच प्रकारचे राजकीय चित्र पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ११ मध्ये दिसून येत आहे. या प्रभागातून माजी नगरसेवक तथा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा, कला व साहित्य समितीचे माजी अध्यक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजय नेवाळे यांच्या पत्नी सत्यभामा संजय नेवाळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.
विशेष म्हणजे, ही उमेदवारी केवळ पक्षीय निर्णयापुरती मर्यादित नसून, स्थानिक नागरिकांमधून आलेल्या मागणीतून आकारास आल्याची चर्चा प्रभागात ऐकायला मिळत आहे. संजय नेवाळे यांनी नगरसेवक म्हणून कार्यरत असताना प्रभाग क्रमांक ११ मध्ये राबवलेल्या विविध विकासकामांची सकारात्मक आठवण आजही नागरिकांमध्ये दिसून येत आहे.
रस्ते, मूलभूत सुविधा, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम तसेच नागरिकांच्या प्रश्नांचे वेळेत निराकरण या बाबींचा उल्लेख नागरिकांकडून सातत्याने केला जात आहे. त्यामुळे संजय नेवाळे यांच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांचा वारसा सत्यभामा नेवाळे यांच्या उमेदवारीला कितपत पूरक ठरतो, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
सत्यभामा नेवाळे यांच्या उमेदवारीनंतर प्रचाराला वेग आला असून, प्रभागात चांगलेच निवडणुकीचे वातावरण तयार झाले आहे. मात्र लोकशाही प्रक्रियेत अंतिम निर्णय हा मतदारांचाच असतो. त्यामुळे संजय नेवाळे यांच्या विकासकामांची पोचपावती मतदार कितपत आणि किती मताधिक्याने सत्यभामा नेवाळे यांच्या पारड्यात टाकतात, हे १६ जानेवारीला स्पष्ट होणार आहे.
प्रभाग क्रमांक ११ मधील निवडणूक लढत चुरशीची ठरण्याची शक्यता असून, सत्यभामा नेवाळे यांच्या उमेदवारीमुळे या प्रभागातील राजकीय चित्राला नवी दिशा मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








