फलटण :- २ सप्टेंबर फलटण येथे जनसंवाद यात्रेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना महत्त्वाचे आश्वासन दिले. त्यांनी स्पष्ट केले की, जर शासकीय किंवा राजकीय यंत्रणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना इतर पक्षात जाण्याची धमकी देत असेल, तर तातडीने त्या बाबीची दखल घेतली जाईल आणि योग्य कारवाई केली जाईल.
अजित पवार यावेळी खासदार सुनील तटकरे, आमदार रामराजे नाईक निंबाळकर, दीपक चव्हाण, आणि जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. त्यांनी सांगितले की, महायुतीसाठी निर्णय घेतला असताना भाजप व शिवसेना यांच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा केली नव्हती, पण या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर कोणत्याही चौकशा किंवा दबाव टाकण्यात आले तर हे सहन केले जाणार नाही.
खासदार सुनील तटकरे यांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त केले की, पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वात कोणत्याही त्रासाला विरोध करण्यात येईल. कार्यकर्त्यांनी पक्षाचे विचार आणि नागरिकांच्या कामांची अचूकपणे अंमलबजावणी करावी, असे त्यांनी सांगितले.
संजय गांधी निराधार योजनेचे फलटण तालुका अध्यक्ष बापूराव गावडे, बाजार समितीचे संचालक शंभूराज पाटील, पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. रेश्मा भोसले आणि सरडे येथील कांतीलाल बेलदार यांसह विविध कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर आपल्या समस्या उपस्थित केल्या.