फलटण, ३१ जुलै २०२५ (साहस Times) – फलटण नगर परिषदेच्या सफाई विभागात २२ वर्षे निष्ठेने सेवा बजावलेल्या श्रीमती माया यशवंत काकडे यांचा सेवानिवृत्ती सत्कार आज एक अत्यंत भावनिक आणि संस्मरणीय क्षण ठरला.
या कार्यक्रमात फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. निखिल मोरे यांनी एक ऐतिहासिक आणि मनाला स्पर्शून जाणारा निर्णय घेतला — त्यांनी स्वतःची मुख्याधिकारी पदांची खुर्ची श्रीमती काकडे यांना अर्पण करत, त्यांना मानाचे आसन दिला. हा क्षण उपस्थित सर्वांसाठी गौरवाचा आणि स्तुत्य ठरला.
नगर परिषदेच्या इतिहासात सफाई कर्मचाऱ्याचा अशा प्रकारचा सन्मान पहिल्यांदाच झाल्यामुळे, याचे सर्वत्र जोरदार कौतुक होत आहे. कार्यक्रमाला श्रीमती माया काकडे यांच्याबरोबर मुलगा योगेश यशवंत काकडे सून पूजा योगेश काकडे व नात यशदा तसेच सर्व विभागांचे अधिकारी, फलटण नगर परिषद म्युनिसिपल कामगार संघटनेचे पदाधिकारी व अधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्याधिकारी मोरे यांची ही कृती ही केवळ एका कर्मचाऱ्याचा सन्मान नसून, कामगारवर्गाविषयी असलेली आपुलकी, कृतज्ञता आणि आदरभावनेचे प्रतीक आहे, असे मत अनेक उपस्थितांनी व्यक्त केले.
फलटण नगर परिषद म्युनिसिपल कामगार संघटनेच्या वतीनेही मुख्याधिकारी श्री. निखिल मोरे यांचे विशेष सत्कार आणि अभिनंदन करण्यात आले.
“एक खुर्चीने इतिहास घडवला, आणि एका कर्मचाऱ्याच्या सेवेला दिला योग्य सन्मान” — फलटण नगर परिषदेत आज हे प्रत्यक्षात दिसले!