
फलटण (साहस Times प्रतिनिधी ): फलटण नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच एका मुख्याधिकाऱ्याला इतक्या भावनिक वातावरणात निरोप देण्यात आला. तत्कालीन मुख्याधिकारी . निखिल मोरे यांनी आपल्या दीड वर्षांच्या कार्यकाळात प्रामाणिक कामगिरी, सौजन्यशील वर्तणूक आणि आत्मीयतेच्या नात्यामुळे मिळवलेल्या लोकप्रियतेचा प्रत्यय निरोप समारंभात आला.
नगरपरिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात एकाच वेळी श्री. मोरे यांचा निरोप समारंभ आणि नूतन मुख्याधिकारी . निखिल जाधव यांचे स्वागत समारंभ पार पडले. दुहेरी सोहळ्याच्या या अनोख्या आयोजनामुळे संपूर्ण वातावरण अविस्मरणीय झाले.
आपल्या कार्यकाळात निखिल मोरे यांनी पालखी सोहळ्याचे यशस्वी नियोजन, बाणगंगा नदीच्या पूरस्थितीचे कुशल व्यवस्थापन, टाटा कमिन्स सीएसआर निधीतून पालिकेच्या शाळांसाठी सुविधा मिळवून देणे, तसेच शहरात प्रथमच स्वातंत्र्यदिनी तिरंगा रोषणाई उभारून कामाचा ठसा उमटवला.
प्रशासकीय कामकाजाबरोबरच त्यांच्या संवेदनशीलतेची झलकही वारंवार दिसून आली. निरोपाच्या दिवशी एका चतुर्थश्रेणी महिला कर्मचाऱ्याला आपल्या खुर्चीवर बसवून केलेला सन्मान संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला. त्याच दिवशी अनुकंपा तत्वावर चार जणांना नोकरी देऊन त्यांनी अनेक कुटुंबांना दिलासा दिला.
या कार्यामुळेच अनेक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते त्यांच्या निरोप समारंभाला उपस्थित राहून त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेतली.








