फलटण — नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या तयारीला सुरुवात झाली असून प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. शासनाच्या नगर विकास विभागाच्या आदेशानुसार हा कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे. आज, दि. १८ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली असून, नागरिकांना आपल्या हरकती व सूचना सादर करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल मोरे यांनी दिली आहे.
नागरिकांसाठी ही प्रभाग रचना नगरपरिषदेच्या सूचना फलकावर आणि अधिकृत वेबसाईटवर कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक नागरिकांनी आपल्या हरकती किंवा सूचना ३१ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नगरपरिषद कार्यालयातील कर विभागात लेखी स्वरूपात सादर कराव्यात. मुदतीनंतर आलेल्या हरकतींचा विचार होणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हरकती व सूचना दाखल केलेल्या नागरिकांसाठी स्वतंत्र सुनावणी आयोजित करण्यात येईल व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल, असेही निखिल मोरे यांनी सांगितले.