शिक्षणासोबत संस्कारांची जोड महत्त्वाची – चंद्रकांत मोहिते

0
67
शिक्षणासोबत संस्कारांची जोड महत्त्वाची – चंद्रकांत मोहिते


फलटण | प्रतिनिधी फलटण शहरातील सोमवार पेठ येथे पौष पोर्णिमेचे औचित्य साधून लहान मुला-मुलींसाठी संस्कार वर्गाचा शुभारंभ उत्साहात पार पडला. या प्रसंगी थोर समाजसुधारिका सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमात उपस्थित बालक-बालिकांसाठी सुत्त पठन, वंदना तसेच भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी गोष्टी सांगण्यात आल्या. या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांमध्ये नैतिक मूल्ये, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवतावादी विचार रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी बोलताना चंद्रकांत मोहिते यांनी “फक्त शिक्षण नव्हे तर त्यासोबत चांगल्या संस्कारांची जोड मिळाल्यासच भावी पिढी सुसंस्कृत आणि जबाबदार नागरिक बनेल,” असे मत व्यक्त केले.
या संस्कार वर्गाच्या आयोजनासाठी प्रदीप खरात, विशाल शिंदे, किशोर मोरे, शिंदे मावशी यांनी विशेष पुढाकार घेतला. तसेच वाघमारे परिवार, शिंदे परिवार, खरात परिवार यांच्यासह सोमवार पेठ येथील उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे परिसरातील पालक व नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, भविष्यातही असे संस्कारात्मक उपक्रम नियमितपणे राबविण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला.