
फलटण प्रतिनिधी : डॉ. संपदा मुंडे यांच्या संशयास्पद आत्महत्येप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा, या मागणीसाठी फलटण शहरात नागरिक व सामाजिक संघटनांच्या वतीने भव्य कँडल मार्च काढण्यात आला.
या शांततामय मोर्चात विविध क्षेत्रातील नागरिक, महिला वर्ग, विद्यार्थी, पत्रकार, डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
संध्याकाळी महात्मा गांधी चौकातून या कँडल मार्चला सुरुवात झाली. “डॉ. संपदाला न्याय मिळालाच पाहिजे!” या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. सहभागी नागरिकांनी मेणबत्त्या पेटवून डॉ. मुंडे यांच्या स्मृतीस अभिवादन केले.
मोर्चाच्या शेवटी दोषींवर कठोर कारवाई, महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना, तसेच डॉक्टर समुदायावर वाढत असलेल्या ताणतणावाच्या घटनांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या.
या कँडल मार्चचे आयोजन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांनी केले होते.
यावेळी आमदार सचिन पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे सचिन सूर्यवंशी, सौ. प्रतिभा चेतन शिंदे, सामाजिक कार्यकर्ते अमीर शेख यांच्यासह विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार आणि स्थानिक तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.








