
फलटण : भारतरत्न, बोधिसत्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त फलटण शहरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आले. मध्यरात्री बारा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, मेणबत्ती प्रज्वलित करून त्रिशरण – पंचशील, बुद्ध पूजा, भीमस्मरण, भीम स्तुती आणि बुद्ध पठन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय बौद्ध महासभा, फलटण शाखेचे कार्यालयीन सचिव बौद्धाचार्य चंद्रकांत मोहिते यांच्या नेतृत्वाखाली झाली. उपस्थित उपासक–उपासिका यांनी सामूहिक पठणात सहभाग घेतला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने विनम्र अभिवादन अर्पण करण्यात आले.
यावेळी बौद्धाचार्य आयु.चंद्रकांत मोहिते यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणापूर्वीच्या अखेरच्या दोन दिवसांतील घडामोडी आणि अंत्यसंस्काराची माहिती अत्यंत सांगोपांगपणे मांडत उपस्थितांना भावूक केले.
कार्यक्रमामध्ये माजी नगरसेवक सचिन अहिवळे यांनी महामानवांना अभिवादन करताना दोन गोष्टी आत्मसात करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले –
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या उच्च पदव्यांचा आदर्श ठेवून आपणही मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण द्यावे.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण आयुष्यभर सुटाबुटात राहून आदर्श घडवला; समाजानेही त्याच मार्गाने आपले साधे पण स्वच्छता आणि नीटनेटकेपणा जपत पेहराव अंगीकारावा असे आव्हान त्यांनी केली.
त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्षीय सदस्य सचिव आयु.कपिल काकडे यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करताना म्हटले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन आदर्श व नीतिमान जीवन जगणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल. तेव्हा सर्वांनी त्याच मार्गाने धम्ममय जीवन जगावे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्षीय सदस्य आयु.गणेश भीमराव अहिवळे यांनी ही समाजातील महत्वाच्या मुद्द्यावर भाष्य करत ज्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे आपली व आपल्या कुटुंबाची प्रगती केली आहे. त्यांनी समाजातील इतर बांधवाना ही पुढे आणण्यासाठी योगदान द्यावे. मदतीचा हात द्यावा असे आवाहन केले आहे.
भारतीय बौद्ध महासभेचे जेष्ठ प्रवचनकार आयु.सोमीनाथ घोरपडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय कार्याचा आढावा घेत सर्वांना आवाहन केले की, “महापरिनिर्वाण दिन हा फक्त औपचारिकता नसून कृतज्ञतेचा दिवस आहे. प्रत्येकाने घरात बुद्ध वंदना घ्यावी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एखादे भाषण वाचून कुटुंबासमवेत अभिवादन करावे.”
अभिवादन कार्यक्रमाची सांगता सर्व बौद्ध उपासक–उपासिका यांनी सरणतंय घेऊन केली. यावेळी विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व आर्थिक असा विविध क्षेत्रातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.








