भकास शहराला बदलण्याचा निर्धार; रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची तीव्र टीका व विकासाची ग्वाही

0
19
भकास शहराला बदलण्याचा निर्धार; रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची तीव्र टीका व विकासाची ग्वाही

साहस Times प्रतिनिधी :  फलटण शहरात आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सुरू असलेल्या दौऱ्यात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सत्ताधारी गटावर जोरदार टीकास्त्र सोडले. तीस वर्षाहून अधिक काळ फलटण नगरपालिकेवर सत्ता उपभोगणाऱ्यांनी शहराचा विकास खुंटवून भकास करण्याचे काम केल्याचा आरोप त्यांनी केला.

नाईक निंबाळकर म्हणाले, “अनेक विकासकामांत मोठा भ्रष्टाचार झाला असून शहरात एकही रस्ता नीट नसणे ही त्यांच्या अपयशाची पावती आहे. भुयारी गटार योजनेचे पैसे कुठे गेले याचा पत्ता नाही. पाणीपुरवठा योजनेतही मोठा भ्रष्टाचार झाला आहे.”

त्यांनी सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या बदलत्या भूमिकेवरही निशाणा साधत—प्रत्येक निवडणुकीत स्वार्थापोटी पक्षबदल आणि मतदारांची दिशाभूल केल्याचा आरोप केला.

याउलट आपल्या नेतृत्वाखाली केलेल्या विकासकामांचा आढावा घेताना त्यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीनंतर अल्पावधीतच फलटण तालुक्यात कोट्यवधींचा निधी आणून अनेक प्रकल्पांना गती दिली असून ग्रामीण भागासह शहरातही विकासकामे सुरू आहेत. शहरातील रस्त्यांसाठी मंजूर निधीची कामे पावसामुळे थांबली होती; मात्र पुढील सहा महिन्यांत रस्त्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राजे गटावर टीका करताना नाईक निंबाळकर म्हणाले, “प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षातून लढत जनतेचा विश्वास त्यांनी गमावला आहे. विधानसभेला मिळालेला धक्का तर आहेच; आता नगरपालिकेतही मोठा धक्का बसणार आहे.”

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना मिळणारा अभूतपूर्व जनसमर्थन पाहता त्यांचा विजय निश्चित असल्याचा दावा त्यांनी केला. सर्व २७ नगरसेवकही प्रचंड मतांनी विजयी होतील, असेही ते म्हणाले.

दरम्यान, नाईक निंबाळकर यांच्या प्रचारदौऱ्याला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ठिकठिकाणी त्यांचे स्वागत केले जात आहे.