साताऱ्यात जिवंत सापडली ‘मृत’ पत्नी; सोलापुरात पती अटकेत, पण जळालेला मृतदेह कोणाचा?

0
4
साताऱ्यात जिवंत सापडली ‘मृत’ पत्नी; सोलापुरात पती अटकेत, पण जळालेला मृतदेह कोणाचा?

मंगळवेढा, सोलापूर : पत्नीला जाळून ठार मारल्याच्या आरोपाखाली पतीला अटक झाली, आणि सर्व प्रकरण बंद झाल्यासारखे वाटत असतानाच या कथेला नवे वळण मिळाले आहे. जी महिला मृत असल्याचे सांगितले जात होते, तीच किरण नावाची महिला साताऱ्यामध्ये तिच्या प्रियकरासोबत जिवंत आढळल्याने संपूर्ण घटनेला वेगळाच ट्विस्ट मिळाला आहे. त्यामुळे पोलिसांपुढे ‘मग जळालेला मृतदेह नेमका कोणाचा?’ हा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे १४ जुलै रोजी गवताच्या गंजीत एका महिलेचा जळालेला मृतदेह आढळला होता. या घटनेनंतर पंढरपूर येथील दशरथ दांडगे यांना फोनवरून सांगण्यात आले की, त्यांची मुलगी किरण हिने स्वतःला पेटवून घेतले. तिचा पती नागेश सावंत यानेही हेच कथन केल्याने पोलिसांनी त्याला अटक केली होती.

मात्र तपास सुरू असतानाच मोठा धक्का बसला, कारण किरण साताऱ्यामध्ये एका व्यक्तीसोबत जिवंत सापडली. ती व्यक्ती किरणचा प्रियकर असल्याचेही पुढे आले आहे. त्यामुळे आता या कथित ‘किरण’च्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे उभे राहिले आहे.

पोलीस प्रशासनाने जळालेल्या मृतदेहाचा डीएनए अहवाल आणि शवविच्छेदनाचा रिपोर्ट मागवला असून, त्या अहवालानंतरच संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होणार आहे.