साखरवाडीत आ. श्रीमंत रामराजेंचा इशारा – “माझ्या नादाला लागू नका; दोन दिवसांत 100 कोटींची नोटीस देणार”

0
50
साखरवाडीत आ. श्रीमंत रामराजेंचा इशारा – “माझ्या नादाला लागू नका; दोन दिवसांत 100 कोटींची नोटीस देणार”

फलटण :-  माजी विधानपरिषद सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी साखरवाडी येथील सभेत बोलतान जोरदार इशारा दिला. “वय वाढलं तरी तुम्हाला किती बुद्धी आहे हे साखरवाडीला माहिती आहे. साखरेचं एक पोत चार व्यापाऱ्यांना विकली. मला तोंड उघडायला लावू नका. कारखाना हा भोगायला नसतो, तो शेतकऱ्यांचे संसार फुलवायला असतो. कारखाना आपल्याला चालवायला जमला नाही हे एकदा तरी मान्य करा. खुर्चीत बसून नाही तर सुरवडीत बसून तुम्हाला लोळवीन, माझ्या नादाला लागू नका. येत्या दोन दिवसांत अब्रुनुकसानीप्रकरणी मी तुम्हाला 100 कोटींची नोटीस देणार,” असा खरमरीत इशारा त्यांनी दिला.

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणानंतर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर विविध आरोप होत आहेत. या प्रकरणामागे आ. श्रीमंत रामराजे असल्याचा आरोप ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी केला होता. त्या आरोपांना उत्तर देताना साखरवाडीतील सभेत रामराजे बोलत होते.

“महिला डॉक्टर आत्महत्येमुळे  फलटणच्या इतिहासाला काळिमा फासला आहे. हा कलंक पुसून काढायचा कसा, हा आपल्यासमोरचा प्रश्न आहे. मी कुणालाही अटक करा असं म्हटलं नाही, पण ज्यांची मनं खातायत त्यांना माहितीय की याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. आजकाल कुणीही अब्रुनुकसानीची नोटीस द्यायला लागले आहेत. ज्यांना अब्रू नाही, त्यांची बेअब्रू कशी झाली हा संशोधनाचा विषय आहे,” अशी टीका रामराजेंनी केली.

“शरद पवारांनी मला सांगितलं होतं – यांच्या भानगडीत पडू नका. पण आपल्या तालुक्यातला माणूस, बागायतदार अडचणीत आहेत म्हणून मी साखरवाडी कारखाना वाचवला. 200 कोटींचा कारखाना मी 69 कोटींना दिला असा माझ्यावर आरोप करतात. मग ज्यांच्या घरात तुम्ही पाणी भरत आहात त्या कारखानदारांना हा कारखाना घ्यायला सांगायचं होतं,” अशी टोलेबाजीही रामराजेंनी केली.

“डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येमुळे नाईक निंबाळकर ब्रँडचे नाव कमी झाले आहे. हे पुसून काढण्यासाठी त्यांच्या हुतात्मा दिनाची साजरी करण्याची वेळ आली आहे. फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या पुतळ्याची उभारणी व्हावी, अशी मागणी सरकारकडे करणार आहे. यामुळे सर्व नाईक निंबाळकर सारखे नाहीत, हा संदेश बाहेर जाईल,” असेही त्यांनी म्हटले.

दरम्यान, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले, “फलटणमध्ये डॉ. संपदा मुंडे यांची आत्महत्या दुर्दैवी आहे. मात्र, साखरवाडीचा कारखाना रामराजेंनी वाचवल्यामुळे साखरवाडीतली एक आत्महत्या नक्कीच टळली.”