CHINA ECONOMY | आर्थिक संकटात ड्रॅगन | Navarashtra (नवराष्ट्र)

0
20
CHINA ECONOMY | आर्थिक संकटात ड्रॅगन | Navarashtra (नवराष्ट्र)


आर्थिक संकटात ड्रॅगन

१ ऑक्टोबर १९४९ हा साम्यवादी चीनचा स्थापना दिवस आहे. इंग्रजांच्या ताब्यातून स्वतंत्र होऊन चीन कम्युनिस्ट देश बनला. या दिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी चीनमध्ये दरवर्षी एक आठवड्याची सुट्टी दिली जाते. या काळात लोक आपल्या नातेवाइकांना भेटण्यासाठी त्यांच्या गावात आणि शहरांमध्ये जातात, बरेच लोक चीनमधील इतर शहरांना भेटायला जातात. या काळात ते खूप पैसे खर्च करतात. चीनी लोक याला ‘गोल्डन वीक’ म्हणतात. इतर शहरांमध्ये फिरण्यासाठी ते खर्च करतात. प्रवासासाठी विमान, ट्रेन आणि बसची तिकिटं खरेदी करतो. इतर शहरांमध्ये जाऊन हॉटेल्स बुक करतो. स्थानिक रेस्टॉरंटमध्ये जेवण करतो. या काळात पर्यटन आणि त्याच्याशी संबंधित इतर उद्योगही भरभराटीला येतात; पण या वेळी ‘गोल्डन वीक’ होऊन अवघे काही दिवस उलटले असून, चीननं आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे. या वेळी चीन सरकारनं जारी केलेला अहवाल अतिशय धक्कादायक आहे. गेल्या २३ वर्षांतील ‘गोल्डन वीक’मध्ये चीनी लोकांनी या वर्षी सर्वात कमी पैसा खर्च केला आहे.

जगातील दुसऱ्या क्रमाकांची अर्थव्यवस्था म्हणून चीनची ओळख आहे. जगाला कर्जाच्या विळख्यात अडकवून आपली तिजोरी भरायची, देशांना मांडलिक बनवायचं, त्यांच्या मालमत्ता ताब्यात घ्यायच्या, जगातील अनेक देशांना शस्त्रास्त्रं विकून पैसे कमवायचे, ही चीनी व्यूहनीती असते. चीनमध्ये ऑक्टोबर महिन्याला असाधारण महत्त्व असत. साम्यवादी चीन सरकारची स्थापना याच महिन्याच्या पहिल्या तारखेला झाली. त्यामुळं ऑक्टोबरचा पहिला आठवडा हा चीनी नागरिकांच्या दृष्टीनं आनंदी पर्व असतं. या काळात चीनी नागरिक ‘गोल्डन वीक’ साजरा करीत असतात. नागरिक घराबाहेर पडून आनंदोत्सव साजरा करीत असतात. या वेळी ‘गोल्डन वीक’मध्ये एकूण ८२ कोटी ६० लाख चीनी नागरिक घराबाहेर पडले. २०१९ च्या तुलनेत हे प्रमाण ४.१ टक्क्यांनी अधिक आहे. कारण त्या वे‍ळी चीनमध्ये कोरोना होता. चीनमध्ये टाळेबंदी होती. त्यामुळं त्या काळात नागरिकांचा खर्च कमी झाला. २०१९ च्या तुलनेत पर्यटकांनी केवळ दीड टक्के जास्त खर्च केला. चीननं एकूण ७५३.४३ अब्ज युआन खर्च केले, जे डॉलरमध्ये १०३ अब्ज आहे. सरकारला अपेक्षित होतं, की या वर्षी ‘गोल्डन वीक’ दरम्यान ८९६ दशलक्ष चीनी नागरिक पर्यटनासाठी बाहेर पडतील आणि ७८२.५ अब्ज युआन खर्च करतील; परंतु सरकारची घोर निराशा झाली. चीन सरकार आणि गोल्डमन सॅक्स यांच्या डेटावरून असं दिसून येतं, की चीनची अर्थव्यवस्था मंदीतून सावरलेली नाही. ही चिन्हं चीनच्या अर्थव्यवस्थेसाठी अतिशय चिंताजनक आहेत.

चीनी सरकारनं अपेक्षा केली होती, की ‘गोल्डन वीक’ दरम्यान, चीनी लोक देशाच्या अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी पैसे खर्च करतील. त्यामुळं चीनच्या अनेक प्रांतीय सरकारांना मदत होईल. प्रांतीय सरकारांना अजूनही आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे. चीनच्या केंद्र सरकारकडूनही आर्थिक मदत मिळेल, असं तिथल्या प्रांतीय सरकारांना वाटत होतं; परंतु असं काही घडलं नाही. सुट्ट्यांमध्ये चीनी लोक भरपूर चित्रपट पाहतात; पण या वेळी ‘गोल्डन वीक’मध्ये संपूर्ण चीनमध्ये दोन अब्ज ७० कोटी युआन किमतीच्या सिनेमाची तिकिटं विकली गेली. त्याची किंमत ३७ कोटी अमेरिकन डॉलर आहे. हे आकडे दर्शवतात, की २०१९ च्या तुलनेत ३९ टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या पाच वर्षातील हा दुसरा सर्वात कमी कमाई करणारा ‘बॉक्स ऑफिस कलेक्शन’ आठवडा होता. चीनची अर्थव्यवस्था सध्या समस्यांना तोंड देत आहे.






Source link