फलटणमध्ये बंटी-बबली जोडीची कोट्यवधींची फसवणूक : १ कोटी ४४ लाखांचा गंडा, गुन्हा दाखल

0
16
फलटणमध्ये बंटी-बबली जोडीची कोट्यवधींची फसवणूक : १ कोटी ४४ लाखांचा गंडा, गुन्हा दाखल

फलटण : फलटण तालुक्यातील मौजे निरगुडी येथील विकास बबन सस्ते व त्यांची पत्नी मनिषा विकास सस्ते या बंटी-बबली जोडीविरुद्ध तब्बल १ कोटी ४४ लाख २१ हजार ६५० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम अधिक तपास करीत आहेत.

कौटुंबिक नात्याचा गैरफायदा

तक्रारदार कृष्णात वसंत जाधव (वय ३७, रा. आसु, ता. फलटण) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, विकास सस्ते व त्यांची पत्नी मनिषा सस्ते यांच्याशी कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध असल्याने त्यांनी विश्वास संपादन करून शेअर मार्केट व डाळिंब खरेदी विक्री (राजलक्ष्मी इंटरप्रायजेस) या व्यवसायात गुंतवणुकीस प्रवृत्त केले. गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून फिर्यादीकडून सुरुवातीला तब्बल ३० लाख रुपये घेतले. त्याबदल्यात प्लॉट तारण ठेवण्यात आला होता.

परंतु नंतर विविध बहाण्यांनी तो प्लॉट पत्नीच्या नावे परत फिरवून घेत गुंतवणुकीवरील परतावा टोलवाटोलवी करून टाळला. उलट आणखी गुंतवणुकीस प्रवृत्त करत एकूण ३६ लाख रुपये फिर्यादीकडून उकळले गेले.

इतर गुंतवणूकदारांचीही फसवणूक

विकास सस्ते आणि मनिषा सस्ते यांनी अशाच प्रकारे आणखी काही व्यक्तींना जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून मोठ्या रकमा घेतल्या आहेत. त्यात –

  • गणेश वसंतराव जगदाळे (रा. मलठण) → 20 लाख रु. (फक्त 2.20 लाख परत)
  • दिपक नामदेव जगदाळे (रा. रामबाग, फलटण) → 15 लाख रु. (परतावा नाही)
  • संदीप भानुदास टोणगे (रा. रामबाग, फलटण) → 20.40 लाख रु. (2.90 लाख परत)
  • दयानंद श्रीरंग वाघमोडे (रा. निंभोरे) → 3.63 लाख रु. (परतावा नाही)
  • सचिन शामराव तारे (रा. निरगुडी) → 46.28 लाख रु. (9.92 लाख परत)
  • धीरज चंद्रकांत जाधव (रा. साखरवाडी) → 8.99 लाख रु. (99 हजार परत)

या सर्वांची एकत्रित १ कोटी ४४ लाख २१ हजार ६५० रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

पोलिसांची सूचना

या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, विकास बबन सस्ते व मनिषा विकास सस्ते यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. ज्यांची फसवणूक झालेली असेल त्यांनी तत्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम यांनी केले आहे.