फलटण : बौद्ध धम्म आणि विज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून बौध्द धम्मात धम्म, अधम्म आणि सदधम्म याचे विश्लेषण सांगितले असून सदधम्मावर आधारित जीवन जगण्याचा मार्ग तथागतांनी सांगितला आहे. बौध्द धम्मात कुठलेही कर्मकांड, अंधश्रद्धा नाही. तिथे वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारला जातो असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे यांनी केले. ते भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुक्याच्या वतीने आयोजित वर्षावास प्रवचन मालिकेतील आठवी पुष्प गुंपताना बोलत होते.
बौद्ध धम्म व विज्ञान यांच्यात अनेक समानता आहेत. दोन्ही सत्य शोधण्यासाठी, पूर्वग्रहांना बाजूला ठेवण्यासाठी आणि प्रत्यक्ष अनुभवावर विश्वास ठेवण्यासाठी प्रयत्न करतात.
बौद्ध धर्म आणि विज्ञानातील समानता
अनुभवावर आधारित आहे.विज्ञान प्रयोगांवर आणि निरीक्षणांवर आधारित असते, तर बौद्ध धर्म साधकाच्या प्रत्यक्ष अनुभवावर आणि आत्म-निरीक्षणावर भर देतो. दोन्हीमध्ये, एखादी गोष्ट खरी आहे असे केवळ सांगितले म्हणून स्वीकारली जात नाही, तर ती स्वतः अनुभवून पाहिली जाते.
कार्य-कारण संबंध हे जसे विज्ञानामध्ये प्रत्येक घटनेमागे काही कारण असते असे मानले जाते. त्याचप्रमाणे बौद्ध धर्मात प्रतीत्यसमुत्पाद हे तत्वज्ञान आहे, जे सांगते की, कोणतीही घटना घडण्यामागे कोणते ना कोणते तरी कारण असतेच. कोणतीही घटना कारणाशिवाय घडत नाही.
पूर्वग्रहांना नकार हे एक महत्वाचे तत्व असून वैज्ञानिक पद्धतीमध्ये, संशोधक आपले पूर्वग्रह बाजूला ठेवून निष्पक्षपणे निरीक्षण करतात. त्याचप्रमाणे, बौद्ध धर्मात गौतम बुद्धानी त्यांच्या अनुयायांना सांगितले की, कोणत्याही गोष्टीवर केवळ श्रद्धेमुळे किंवा परंपरेमुळे विश्वास ठेवू नका, तर ती स्वतः तपासल्यानंतरच स्वीकारा.
सतत बदल हे विज्ञानाचे शाश्वत सत्य आहे. विज्ञान विश्वातील प्रत्येक गोष्ट सतत बदलत असते असे मानते. बौद्ध धर्मात, अनित्यता हे एक मूलभूत तत्व आहे, जे सांगते की, सर्व काही क्षणभंगुर आहे आणि सतत बदलत असते.
बौद्ध धर्म आणि विज्ञानातील फरक
अंतिम उद्दिष्ट हेच आहे की, विज्ञानाचे मुख्य उद्दिष्ट बाह्य जगाची माहिती मिळवणे आणि नैसर्गिक नियमांचा शोध घेणे आहे. बौद्ध धर्माचे मुख्य उद्दिष्ट आंतरिक शांती, दुःख-मुक्ती आणि निर्वाण प्राप्त करणे आहे.
विज्ञान भौतिक जगताचा अभ्यास करते.बौद्ध धर्म प्रामुख्याने मानवी मन, चेतना आणि भावनांचा अभ्यास करतो.विज्ञान हे मूल्यांपासून तटस्थ असते. त्याचा उपयोग चांगल्या किंवा वाईट दोन्ही कामांसाठी होऊ शकतो. बौद्ध धर्म हा नीतिमत्तेवर (शील) आणि करुणा यावर आधारित आहे, जो मानवी कल्याणासाठी मार्गदर्शन करतो.
अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी एकदा म्हटले होते की, “जर कोणताही धर्म आधुनिक वैज्ञानिक गरजा पूर्ण करू शकला, तर तो बौद्ध धर्म असेल.” हा धर्म आणि विज्ञान यांच्यातील समानतेवर प्रकाश टाकतो. बौद्ध धर्म विज्ञानाला पूरक असू शकतो, कारण विज्ञान बाह्य जगाचे ज्ञान देते, तर बौद्ध धर्म आंतरिक जगाला समजून घेण्यासाठी एक पद्धत प्रदान करतो. त्यामुळे, बौद्ध धर्म आणि विज्ञान हे सत्य आणि ज्ञान मिळवण्याच्या दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत असे प्रतिपादन विठ्ठल निकाळजे यांनी केले.
यावेळी धम्मगुरु भंते कश्यप(परभणी)यांनी उपासक उपासिका यांना त्रिशरण पंचशील दिले.त्यांनी धम्मदेसना दिली.या कार्यक्रमाला उपस्थित केंद्रीय असिस्टंट स्टाफ ऑफिसर दादासाहेब भोसले तसेच भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे अध्यक्ष महावीर भालेराव, महासचिव बाबासाहेब जगताप, कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे, प्रचार आणि पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष रामचंद्र मोरे, कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते, तालुका संघटक विजयकुमार जगताप, संपत जयसिंग भोसले तालुका शाखा संरक्षण उपाध्यक्ष व वाटर निंबाळकर गावचे सर्व बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने संविधानाची प्रत उपासक उपासिकांना देण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फलटण तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष महावीर भालेराव यांनी केले व त्यांनी मार्गदर्शन ही केले.