भंते काश्यप यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांमध्ये बौद्ध संस्कारांचा जागर — वर्षावास काळातील प्रेरणादायी उपक्रम

0
83
भंते काश्यप यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांमध्ये बौद्ध संस्कारांचा जागर — वर्षावास काळातील प्रेरणादायी उपक्रम


फलटण | प्रतिनिधी.  भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने शाहू,फुले, आंबेडकर सभागृह, बुद्ध विहार येथे गेल्या तीन महिन्यांपासून वर्षावास काळात पूज्य भंते काश्यप यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांचा संस्कार वर्ग घेण्यात आला. या उपक्रमातून स्थानिक महिलांमध्ये बौद्ध धम्माविषयीची जाणीव, श्रद्धा आणि आचारधर्म दृढ होताना दिसून आला.

या वर्गाचा प्रारंभ तीन महिन्यांपूर्वी झाला तेव्हा अनेक महिलांना त्रिसरण पंचशील आणि सूत्रपठन याविषयी प्राथमिक ज्ञानही नव्हते. परंतु भंते काश्यप यांनी अत्यंत संयमाने, विनम्रतेने आणि नियमितपणे रोज सायंकाळी ५ ते ६ या वेळेत वर्ग घेतला. त्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे महिलांनी सूत्र पठण आत्मसात केले आणि त्रिसरण-पंचशील यांचे अर्थ समजून घेतले.

भंते काश्यप यांनी या काळात केवळ पठण शिकवले नाही, तर बौद्ध धम्मातील संस्कार, सदाचार, आणि नैतिक मूल्ये याविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी धम्म म्हणजे केवळ पूजाअर्चा नव्हे, तर जीवन जगण्याची पद्धत आहे हे महिलांच्या मनात घट्ट रुजवले.

दररोजच्या सूत्र पठणाच्या सरावामुळे आज या सर्व महिलांना संपूर्ण सूत्र पठण मुखोद्गत झाले आहे. त्यामुळे त्या रोज बुद्ध विहारात एकत्र येऊन सामूहिकरित्या सूत्र पठण करतात. या माध्यमातून महिलांमध्ये शिस्त, एकता आणि बौद्ध संस्कारांची भावना दृढ झाली आहे.

कोळकी येथील बुद्ध विहारात या काळात भंते काश्यप यांनी सतत उपस्थित राहून आपली सेवा दिली. त्यांनी महिलांना केवळ धम्माचे सैद्धांतिक ज्ञान दिले नाही, तर ते आचारात आणण्यासाठी प्रेरित केले. त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अनेक महिला आज बौद्ध धम्माच्या मूल्यांनुसार सदाचारी जीवन जगत आहेत.

भंते काश्यप यांचा हा उपक्रम महिलांच्या बौद्धिक आणि आध्यात्मिक उन्नतीचा एक सुंदर आदर्श ठरला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली निर्माण झालेली ही नवचळवळ ग्रामीण समाजातील बौद्ध संस्कारांना नवसंजीवनी देणारी ठरली आहे. यावेळी जेष्ठ समाजसेविका कांताताई काकडे, वंचित बहुजन आघाडीच्या जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी चित्रा गायकवाड, सुनिता चंदन काकडे, विद्या मोहन खंडारे, परिमिता सुनील कांबळे, लक्ष्मीबाई विकास आढाव, आरती विशाल पाटील, व इतर महिला यांनी नियमित उपस्थित राहून धम्म श्रवण केला. अस्मिता प्रवीण घोडके, रजनी सुहास माने, अलिशा शुभम अहिवळे, रुचिता चंदन काकडे, संतोष देवकर, जय संतोष देवकर यांच्यासह बौद्ध उपासक उपासिका नियमित संस्कार वर्गासाठी उपस्थित होते.
त्यांच्या या सत्कर्मामुळे केंद्रीय पदाधिकारी तथा राज्याचे संघटक सातारा व पुणे जिल्ह्याचे प्रभारी, समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर दादासाहेब भोसले सर, भारतीय बौद्ध महासभेच्या तालुका शाखेचे सन्माननीय अध्यक्ष आयु.महावीर भालेराव सर, महासचिव बाबासाहेब जगताप सर, कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे सर, कार्यालयीन सचिव तथा बौद्धाचार्य आयु.चंद्रकांत मोहिते सर, संस्कार सचिव आयु. बजरंग गायकवाड सर, प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष आयु.रामचंद्र मोरे सर, संघटक आनंद जगताप यांच्यासह सर्व तालुका शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी भंते काश्यप यांच्याप्रति त्रिवार वंदन केले.