
फलटण, :- फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक अशोकराव जाधव यांनी काल त्यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर टाकलेल्या ‘राजीनाम्याच्या’ मजकुरामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर त्यांनी आज स्पष्ट खुलासा करत गैरसमज दूर केला आहे.
जाधव यांनी सांगितले की, वॉर्डातील काही विकासकामांवरून त्यांचे आणि खासदार कार्यालयाचे काही मतभेद झाले होते. त्यामुळेच क्षणिक भावनेच्या आहारी जाऊन त्यांनी राजीनाम्याचा स्टेटस ठेवला होता.
“खासदार साहेबांनी सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर सगळा गैरसमज दूर झाला आहे. आता मी खासदार गट आणि भाजप पक्षासोबतच काम सुरू ठेवणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांनी फलटण तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की, कोणताही गैरसमज करून घेऊ नये. पक्षाच्या धोरणांशी एकनिष्ठ राहून आपण विकासकामांवर लक्ष केंद्रीत करू, असेही त्यांनी सांगितले.








