फलटण पंचायत समितीत दिव्यांगांसाठी कृत्रिम हातपाय बसविणे शिबिर यशस्वी; महागाईच्या पार्श्वभूमीवर अनुदानात १००० रुपयांची वाढ

0
3
फलटण पंचायत समितीत दिव्यांगांसाठी कृत्रिम हातपाय बसविणे शिबिर यशस्वी; महागाईच्या पार्श्वभूमीवर अनुदानात १००० रुपयांची वाढ

फलटण ( साहस Times ) : केंद्र शासनाच्या एडीएफ योजनेअंतर्गत आणि अलिमको (एस. आर. ट्रस्ट, रतलाम – मध्यप्रदेश) व पंचायत समिती फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने, तालुक्यातील दिव्यांग नागरिकांसाठी कृत्रिम हातपाय बसविण्याचे शिबिर पंचायत समितीच्या प्रांगणात संपन्न झाले. या शिबिराला दिव्यांग बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

दरम्यान, केंद्र व राज्य शासनाच्या दिव्यांग अनुदान योजनेत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, कॅबिनेट बैठकीत दरमहा मिळणाऱ्या १५०० रुपयांच्या अनुदानात १००० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या महिन्यापासून दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा २५०० रुपये त्यांच्या बँक खात्यावर थेट मिळणार आहेत.

यावेळी आमदार सचिन पाटील यांनी, “दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण हे शासनाचे प्रथम कर्तव्य आहे. कोणताही अपात्र व्यक्ती दिव्यांग योजनेचा गैरफायदा घेत असल्यास ती थेट शासनाची फसवणूक आहे. अशा प्रकरणांवर तात्काळ कारवाई होणे आवश्यक आहे,” असे सांगितले. तसेच “दिव्यांगांच्या अडचणी शासन दरबारी मांडणारा त्यांचा भाऊ म्हणून मी नेहमी त्यांच्यासोबत राहीन. त्यांच्या विकासासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे,” असेही ते म्हणाले.

कार्यक्रमास माजी पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, माजी नगरसेवक सुदाम मांढरे, महाराष्ट्र दिव्यांग संघर्ष समितीचे सचिव कृष्णा पवार, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष साताराचे शिवालय वारुळे तसेच अनेक दिव्यांग लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.