फलटणच्या कुमारी अंकिता भोसलेचे राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत यश

0
9
फलटणच्या कुमारी अंकिता भोसलेचे राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत यश

फलटण :- फलटण येथील आयडियल किड्स इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी कुमारी अंकिता कल्याण भोसले हिने महाराष्ट्र राज्य पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता ५ वी) राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत बारावा क्रमांक मिळवून एक उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांनी दिलेल्या या स्पर्धात्मक परीक्षेत अंकिताने बुद्धिमत्ता, सातत्यपूर्ण अभ्यास आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर हे यश मिळवले. तिच्या या कामगिरीने पालक, शाळा तसेच फलटण शहराचा मान उंचावला आहे.

या यशाबद्दल शाळेच्या प्राचार्या डॉ. वैशाली शिंदे यांनी तिचे अभिनंदन करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांना योग्य वातावरण आणि आत्मविश्वास दिल्यास ते कोणत्याही स्पर्धेत चमक दाखवू शकतात. अंकिताचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.”

अंकिता भोसलेच्या या कामगिरीमुळे आयडियल किड्स इंटरनॅशनल स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, शाळेत आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे.