
फलटण :- फलटण शहरातील एका हॉटेलमध्ये नुकत्याच एका डॉक्टरांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली असून ती अत्यंत दुर्दैवी, लाजिरवाणी आणि धक्कादायक आहे.
या घटनेनंतर डॉक्टरी पेशातील ताण, तणाव आणि मानसिक दडपण पुन्हा एकदा समोर आले आहे.
डॉक्टर होण्यासाठी एखादा विद्यार्थी आपल्या आयुष्याची १० ते १२ वर्षे झिजवतो. तो जेव्हा प्रॅक्टिस सुरू करतो, तेव्हा त्याचे वय तिशीच्या पुढे गेलेले असते. “डॉक्टर” हा समाजासाठी कार्य करणारा नोबल (पवित्र) व्यवसाय आहे, पण हे विसरून चालणार नाही की डॉक्टर हाही एक माणूसच आहे — त्यालाही भावना, जबाबदाऱ्या आणि वैयक्तिक आयुष्य आहे.
प्रत्येक डॉक्टरने स्वतःचे आत्मपरीक्षण करून आत्मबल वाढवणे गरजेचे आहे. आत्महत्या ही कोणत्याही समस्येचे उत्तर नसते; ती एक पळवाट असते. आयुष्य संपवून काही सुटत नाही — प्रत्येकाने स्वतःची काळजी घेत समाजासाठी काम करत राहणे हेच योग्य.
आपले काम आवडते असेल, आणि आपण ते सकारात्मक दृष्टीकोनातून करत असू, तर ताण कमी जाणवतो. प्रत्येक डॉक्टरने स्वतःच्या आरोग्याची, मानसिक स्थितीची आणि मनःशांतीची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे जितके रुग्णसेवा करणे.
आत्मबल वाढवण्यासाठी आध्यात्मिक उन्नती, सकारात्मक विचार आणि चांगल्या सहवासाची गरज आहे. काही ताण, अडचणी किंवा मानसिक दडपण वाटत असेल, तर ते मनात न ठेवता आपल्या मित्र, मैत्रिणी, कुटुंबीय किंवा विश्वासू व्यक्तीशी बोलून शेअर करा.
दुसऱ्या गावात काम करणाऱ्या डॉक्टरांसाठी एक स्थानिक (लोकल) गार्डियन असावा जो त्यांच्या दैनंदिन जीवनाकडे लक्ष देईल.
डॉ. मुंडे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात नेमके कारण आणि जबाबदार कोण हे पोलिस तपासत आहेत. पण समाज म्हणून आपल्यावरही जबाबदारी आहे — डॉक्टरांवर होणारा ताण कमी व्हावा, त्यांना मानसिक आधार मिळावा, यासाठी समाजानेही पुढे यायला हवे.
ही घटना फलटणच्या इतिहासात काळिमा फासणारी आहे. सर्व फलटणकर डॉक्टर आणि नागरिक या घटनेचा तीव्र निषेध करतात आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करतात.
डॉक्टरी पेशा अजूनही नोबल आहे,
पण त्यात हतबल न होता सकारात्मकतेने कर्म करा.
पेशंटला बरे करण्याचा घेतलेला वसा निभावताना
स्वतःची काळजी घ्या — हेच खरे यश!








