पंच्याऐंशीवर्षीय आजीबाईंना पुस्तकांची गोडी; निंबूत येथील बबई बनसोडे दिवसभर वाचनात मग्न !

0
20
पंच्याऐंशीवर्षीय आजीबाईंना पुस्तकांची गोडी; निंबूत येथील बबई बनसोडे दिवसभर वाचनात मग्न !

बारामती : “सावित्रीबाईंनी मुलींच्या शिक्षणाचं वारं आणलं, म्हणून तर मला इंग्रजकाळात शाळेची पायरी चढता आली. लिहिता-वाचता यायला लागलं. आख्ख्या कांबळेश्वर भागात आम्ही शाळेत तीनच पोरी होतो. सातवीनंतर जवळपास शाळा नसल्यानं शिक्षण खुंटलं; लग्न झालं अन वाचणं थांबलं, पण आता मोकळा वेळ मिळतोय. इतका वाचायचा नाद लागलाय की मोकळं बसू वाटत नाही…”

निंबूत (ता. बारामती) येथील बबई केरबा बनसोडे या पंच्च्याऐंशी वर्षीय आजीबाई याना पुस्तक वाचनाचा छंद जडलाय त्यांच्याशी संवाद साधायला घरी गेले तेव्हाही त्या ‘समग्र अण्णा भाऊ साठे’ हा जाडजूड ग्रंथ वाचण्यात मग्न झाल्या होत्या. त्यांच्या आजूबाजूलाही पुस्तके पडलेली. त्यामध्ये आध्यात्मिक नव्हे, तर वैचारिक पुस्तकांचाच भरणा होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, अण्णा भाऊ साठे, छत्रपती शाहू महाराज यांच्यावरील पुस्तके अधिक आहेत. त्यांनी डॉ. नरेंद्र दाभोळकर, सुधा मुर्ती, अनिल अवचट यांचीही पुस्तके वाचलीत., शरद पवार यांचे ‘लोक माझे सांगाती’, ही पुस्तकेही त्यांनी आवडीने वाचली आहेत. अण्णा भाऊंचे ‘फकीरा’ आणि सिंधूताई सपकाळ यांचे चरित्र सर्वाधिक आवडल्याचे त्या सांगतात.

सकाळी सहाला उठून स्वतःचे स्वतः आवरायचे. आणि घरासमोरच्या झोपाळ्यात बसून दिवसभर वाचत बसायचे हा त्यांचा आता नित्यनियम. लहानपणी वाचनाची आवड होती, परंतु लग्नानंतर जबाबदाऱ्या पेलता पेलता आयुष्य चष्म्याशिवाय वाचन बबई बनसोडे म्हणाल्या, फुल्यांचे प्रयत्न आणि गांधीबाबांचा, बाबासाहेबांचा आग्रह यांमुळे आम्ही दलित कुटुंबातील मुली शिकू शकलो. गांधीविचाराने भारावलेले चुलते लक्ष्मण जगताप यांनी शाळेत धाडले. लग्नानंतर पतीचा वेळ राजकारणात जायचा, तेव्हा शेती व घर सांभाळण्यात पुस्तके मागे पडली. सुरवातीला मजुरीदेखील केली. पुढे काकडे कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे पती सोमेश्वर कारखान्याचे संचालक झाले, तर मीही आरक्षण नसताना १९६३ मध्ये देशातील पहिली सर्व महिला सदस्य असलेल्या निंबूत ग्रामपंचायतीत सदस्य झाले. तीन पिढ्या डोळ्यांसमोर एकत्र नांदत आहेत हे खरे सुख. तब्येतीची कुठलीच तक्रार नाही. चष्म्याशिवाय पेपर वाचायचे आता पुस्तके वाचतेय.

उतारवयात गेली आठ-दहा वर्ष त्या घरात येणारे ‘सकाळ’ वृत्तपत्र आवर्जून वाचतात. आता गेल्या वर्षभरापासून पुस्तकांची गोडी लागलीय. त्यांचे चिरंजीव निवृत्त मुख्याध्यापक भीमराव बनसोडे व प्रगतिशील शेतकरी राजकुमार बनसोडे यांना पुस्तके पुरविण्याचे काम लागले आहे. नातूदेखील काकडे महाविद्यालयातून पुस्तके आणून देतो आणि बबईबाई त्यांचा फडशा पाडतात.