
फलटण प्रतिनिधी :- राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी गेल्या काही दिवसांत केलेल्या वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाला असून विरोधकांकडून त्यांच्या तीव्र शब्दांत टीका होत आहे. फलटणमधील महिला डॉक्टर युवतीच्या आत्महत्येनंतर रूपाली चाकणकर यांनी केलेल्या विधानामुळे जनतेत आणि राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट भूमिका घेत चाकणकर यांच्या वक्तव्याशी असहमती दर्शवली आहे. अजित पवार यांनी मृत डॉक्टर युवतीच्या कुटुंबीयांशी फोनवर संवाद साधला आणि या न्यायाच्या लढाईत मी तुमच्या पाठीशी आहे, असे सांगितले. त्यांनी सांगितले की, “मी नेहमी सत्याच्या बाजूने असतो आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या वक्तव्याशी सहमत नाही.” तसेच हे प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालण्याचीही भूमिका त्यांनी घेतली आहे.
या घडामोडीनंतर आता रूपाली चाकणकर यांच्यावर कारवाई होणार का, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. महिला आयोगावर विरोधक सातत्याने निशाणा साधत आहेत.
दरम्यान, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रूपाली चाकणकरांवर कठोर टीका केली आहे. फलटणमधील पत्रकार परिषदेत चाकणकर यांनी मृत युवतीच्या चारित्र्याचा उल्लेख केल्याने अंधारे यांनी तीव्र आक्षेप घेतला. “ती युवती कितीजणांशी बोलत होती, हे सांगून तुम्ही तिची बदनामी केली. ती गेल्यानंतर तिच्या चारित्र्यावर शिंतोडे का उडवताय?” असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनाही अंधारे यांनी आवाहन केले की, महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर जबाबदार व्यक्तीची नेमणूक करावी आणि या पदाचा वापर पुनर्वसनासाठी होऊ देऊ नये. “पक्षाची आणि महिला आयोगाची इभ्रत राखा,” असा सल्ला त्यांनी दिला.








