
ॲड. सचिन सुधाकर वाघ यांची बारामती वकील संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड; कार्यकारिणीसाठी १४ जुलैला मतदान
बारामती | प्रतिनिधी : बारामती वकील संघटनेच्या अध्यक्षपदी ॲड. सचिन सुधाकर वाघ यांची बिनविरोध निवड झाल्याने बारामतीच्या विधी क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांवर चर्चेनंतर एकमत झाल्याने ही निवड बिनविरोध झाली. निवडीची घोषणा होताच ॲड. सचिन वाघ यांच्या समर्थक वकिलांनी जल्लोष करत त्यांचे अभिनंदन केले.
बारामती वकील संघटनेच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी ॲड. सचिन सुधाकर वाघ, ॲड. सुप्रिया काकडे, ॲड. अविनाश गायकवाड आणि ॲड. अभिजीत जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र सर्व उमेदवारांमध्ये झालेल्या चर्चेनंतर अध्यक्षपद बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ॲड. सुप्रिया काकडे, ॲड. अविनाश गायकवाड आणि ॲड. अभिजीत जगताप यांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे ॲड. सचिन सुधाकर वाघ यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड निश्चित झाली.
अध्यक्षपद बिनविरोध झाले असले तरी कार्यकारिणीच्या इतर पदांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी मंगळवार, दि. १४ जुलै रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून निकालानंतर नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात येणार आहे.
उपाध्यक्षपदासाठी ॲड. माधुरी नेवसे, ॲड. चित्रा वाघमोडे, ॲड. अक्षय गायकवाड, ॲड. राजेंद्र मासाळ, ॲड. महेश आटोळे आणि ॲड. शकीला आत्तार हे उमेदवार रिंगणात आहेत. तर ॲड. सचिन दळवी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
सचिवपदासाठी ॲड. विक्रांत कोकरे आणि ॲड. स्नेहा मखरे यांच्यात थेट लढत होणार असून ॲड. हर्षद जगदाळे यांनी माघार घेतली आहे. सहसचिव पदासाठी ॲड. आकाश घारे आणि ॲड. विशाल होळकर हे उमेदवार मैदानात आहेत. या पदासाठी ॲड. भूषण जगताप यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे.
ग्रंथपाल पदासाठी ॲड. अक्षय गायकवाड आणि ॲड. कल्याण राजगुरू यांच्यात सामना रंगणार असून ॲड. राहुल बंडगर यांनी माघार घेतली आहे. खजिनदार पदासाठी ॲड. हर्षद तिकोटे आणि ॲड. भूषण जगताप हे उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
महिला प्रतिनिधी पदासाठी ॲड. नुजहत शिकीलकर आणि ॲड. भाग्यश्री जगधने या उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे. त्यामुळे कार्यकारिणीतील विविध पदांसाठी चुरशीची निवडणूक होण्याची चिन्हे आहेत.
अध्यक्षपद बिनविरोध झाल्यामुळे निवडणुकीतील वातावरण अधिक सकारात्मक झाले असून आता सर्वांचे लक्ष १४ जुलै रोजी होणाऱ्या मतदानाकडे लागले आहे. नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून बारामती वकील संघटनेच्या कामकाजाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा वकील बांधवांकडून व्यक्त केली जात आहे.










