
साखरवाडी (ता. फलटण) येथे गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या विविध विकासकामांचा भव्य शुभारंभ व भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. माजी खासदार मा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर व आमदार मा. सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन अॅड. जिजामाला नाईक निंबाळकर वहिनी साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या विकासकामांमध्ये येथील शासकीय दवाखान्यासाठी नूतन इमारत बांधकाम, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाची उभारणी, तसेच गावातील अंतर्गत रस्त्यांची डांबरीकरण व दुरुस्तीची कामे यांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे ग्रामस्थांना उत्तम आरोग्यसेवा, स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण तसेच मजबूत पायाभूत सुविधा उपलब्ध होणार असून साखरवाडीच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे.
कार्यक्रमावेळी उपस्थित मान्यवरांनी या विकासकामांमुळे गावाच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीस मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट ग्रामस्थांपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकप्रतिनिधी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या प्रसंगी ज्येष्ठ नेते श्री. प्रल्हादतात्या साळुंखे पाटील, भाजपा महिला तालुकाध्यक्षा सौ. उषाताई राऊत, युवा नेते श्री. अमरसिंह नाईक निंबाळकर, श्री. विक्रमसिंह (आप्पा) पांडुरंग भोसले (माजी सरपंच, साखरवाडी ग्रामपंचायत) यांच्यासह पंचक्रोशीतील अनेक मान्यवर, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.








