
फलटण | साहस Times : फलटण शहरातील अनेक खासगी तसेच अनुदानित शाळांमध्ये सध्या ‘अकॅडमी संस्कृती’चे पेव फुटले असून, या अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या पालकांकडून अवाजवी फी वसूल केली जात आहे. सरकारी अनुदान मिळवणाऱ्या शाळांमध्येही ही प्रथा वाढत असून, शाळा व्यवस्थापन आणि अकॅडमी चालक यांच्यातील संगनमतामुळे ही आर्थिक लूट अधिकच बळावत असल्याचा आरोप होत आहे.
विशेषतः पहिली ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मूलभूत संकल्पना नीट समजत नसतानाही, त्यांच्यावर अकॅडमीचे अतिरिक्त ओझे लादले जात आहे. शाळांमध्ये शिक्षक अध्यापनात कमी पडत असतील, तर त्यांना प्रशिक्षण देण्याऐवजी बाहेर अकॅडमी सुरू करून त्याच विद्यार्थ्यांना पुन्हा शिकवण्याचा व्याप वाढवला जात आहे.
या अकॅडमी बिनमान्यता असून, ना त्यांचा अभ्यासक्रम शैक्षणिक नियमांशी सुसंगत आहे ना सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन. त्यामुळे वर्गांमध्ये भेदभाव, मानसिक तणाव आणि शैक्षणिक गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या विरोधात कामगार संघर्ष संघटनेने आवाज उठवला असून, संघटनेचे अध्यक्ष सनी काकडे यांनी स्थानिक गट शिक्षण अधिकारी व दंडाधिकारी यांच्याकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. तसेच भारत सरकारने जाहीर केलेल्या कोचिंग क्लासेससंदर्भातील नियमांची अंमलबजावणी फलटणमध्ये होत नसल्यामुळे या बिनमान्यता अकॅडमी त्वरित बंद करण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.








