
फलटण (प्रतिनिधी): फलटण तालुक्यात अवैध संबंधाच्या संशयातून एका युवकाची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केल्याची थरकाप उडवणारी घटना उघडकीस आली असून, या प्रकाराने संपूर्ण सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. प्रियकर आणि संबंधित महिलेच्या नवऱ्याच्या मदतीने युवकाची लाकूड कापण्याच्या मशीनने हत्या करून त्याचे अवयव वेगळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मौजे सोमंथळी (ता. फलटण) येथील सतीश उर्फ आप्पा दादासो दडस याचा मंगळवार, दि. १४ जानेवारी २०२५ रोजी त्याच्याच कामातील काही लोकांशी वाद झाला होता. या वादानंतर संबंधित महिलेच्या नवऱ्याने सतीशच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून त्याला गंभीर जखमी केले.
जखमी अवस्थेत सतीशला उपचारासाठी दवाखान्यात नेत असल्याचा बनाव करून आरोपींनी त्याला विडणी येथील मांगोबामाळ परिसरात नेले. मात्र उपचार न करता पुढे धुलदेव गावाच्या हद्दीतील भिवरकर वाडी येथे नेऊन त्याच्या डोक्यात दगड घालून पुन्हा हल्ला करण्यात आला.
यानंतर आरोपींनी केलेला कृत्य माणुसकीला काळीमा फासणारे ठरले आहे. लाकूड कापण्याच्या मशीनचा वापर करून सतीश उर्फ आप्पाचे मुंडके, खांद्यापासून हात व गुडघ्यापासून पाय वेगळे करण्यात आले. मुख्य धड साठे गावातील एका शेतात गाळात पुरून ठेवण्यात आले, तर हात, पाय आणि मुंडके निरा नदीत फेकून दिल्याची कबुली संशयित आरोपींनी दिल्याचे समजते.
या अमानुष हत्येमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रकरणाचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून, आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे.








