शिवथर (ता. सातारा) – दुपारच्या सुमारास घरात एकटी असलेल्या महिलेचा अज्ञात हल्लेखोराने धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली. शिवथर येथील गुजाबा वस्तीवर सोमवारी (दि. ७ जुलै) दुपारी चारच्या सुमारास पूजा प्रथमेश जाधव (वय ३०) हिचा खून करण्यात आला. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत तपासासाठी विशेष पथके रवाना केली असून, गुन्हे शाखा, ठसेतज्ज्ञ व श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पूजा हिचा सुमारे १० वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. तिचा पती प्रथमेश जाधव साताऱ्यातील एका दुकानात काम करतो. सोमवारी नेहमीप्रमाणे तो कामावर गेला होता. पूजाचे सासू-सासरे शेतात आणि मुलगा शाळेत गेलेला असताना पूजा घरात एकटी होती. दुपारी चारच्या सुमारास सासरे घरी आले, तेव्हा पूजा ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्यांनी आरडाओरडा केल्यावर शेजारी धावले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार झाल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गुन्हे शाखेची टीम, श्वान पथक व ठसे तज्ज्ञांनी सर्व परिसर पिंजून काढला. मात्र, खून झाल्यानंतर वापरण्यात आलेले शस्त्र सापडलेले नाही.
ही वस्ती फारशी मोठी नसून केवळ ५-६ घरे आहेत. दुपारी सर्वजण शेतात गेले असताना ही घटना घडली. गुजाबा वस्ती शिवथरपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर सातारा-मालगाव रस्त्यालगत आहे. या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासण्यात येत आहेत. हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद झाला आहे का, याचीही चौकशी सुरू आहे.
दरम्यान, या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत सातारा तालुका पोलिस ठाण्यात झाली नव्हती. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.