फलटण तालुक्यात बनावट खतांचा धक्कादायक प्रकार उघड

0
62
फलटण तालुक्यात बनावट खतांचा धक्कादायक प्रकार उघड


फलटण | प्रतिनिधी.  फलटण तालुक्यातील टाकळवाडे (ता. फलटण, जि. सातारा) येथे शेतकऱ्यांच्या विश्वासाशी घात करणारा गंभीर प्रकार समोर आला आहे. टाकळवाडे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. मार्फत शेतकऱ्यांना पुरवण्यात येणारी खते बनावट असल्याचे उघड झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पतपुरवठ्यासह खते, बी-बियाणे व कृषी औषधांची विक्री करणाऱ्या या संस्थेमध्ये बनावट खतांची विक्री होत असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाला मिळाली होती. त्यानंतर कृषी विभागाने तातडीने कारवाई करत संस्थेच्या गोडावूनमधून खतांचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले.
प्रयोगशाळेच्या अहवालात संबंधित खत मानकांनुसार नसून ते बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी दि. ०८ जानेवारी २०२६ रोजी श्रीमती सोनाली सुतार, कृषी अधिकारी (गुणवत्ता नियंत्रण), फलटण तालुका कृषी विभाग यांनी दिलेल्या तक्रारीवरून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १६/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
हा गुन्हा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात नोंदवण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे व पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार करीत आहेत.
बनावट खतांच्या विक्रीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.