फलटणमध्ये रंगणार ‘राजे विरुद्ध खासदार’ महासंग्राम! – नगरपरिषदेसाठी दोन्ही गटांचे ‘पॉवर गेम’ सुरू

0
26
फलटणमध्ये रंगणार ‘राजे विरुद्ध खासदार’ महासंग्राम! – नगरपरिषदेसाठी दोन्ही गटांचे ‘पॉवर गेम’ सुरू

फलटण प्रतिनिधी  : आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी “बदला नाही, बदल घडवायचा आहे” या निर्धाराने मैदानात उतरल्याने फलटणच्या राजकारणात नवे समीकरण आकार घेत आहेत. नगरपालिकेवर आपले नेतृत्व स्थापित करण्यासाठी त्यांनी प्रत्येक प्रभागात सशक्त उमेदवार उभे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.

दरम्यान, रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या गटातील काही प्रभावी नेते व कार्यकर्त्यांना आपल्या गटात घेतल्याने राजे गटातही हालचालींना वेग आला आहे.

मुंबईत झालेल्या दोन दिवसांच्या दौऱ्यात श्रीमंत रामराजे, श्रीमंत रघुनाथराजे आणि श्रीमंत संजीवराजे यांनी नव्या रणनीतीवर शिक्कामोर्तब केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. “दहशतमुक्त फलटण” या टॅगलाईनखाली हे तिन्ही राजे पुन्हा एकदा सत्ताधारी महायुतीच्या नेतृत्वाखाली फलटण नगरपालिका आपल्या ताब्यात घेण्यासाठी सज्ज झाले आहेत.

या घडामोडींमुळे फलटण नगरपरिषद निवडणूक ही राजे गट विरुद्ध खासदार गट अशा थेट लढतीत रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शहरात राजकीय तापमान चढले असून — “फलटणमध्ये पुन्हा ‘रामराज्य’ येणार का? की खासदार गटाकडे सत्ता जाणार?” — या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी केवळ फलटणच नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष या लढतीकडे लागले आहे.