अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचा हात : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस कार्यक्रम स्थगित

0
76
अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचा हात : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस कार्यक्रम स्थगित

माजी आमदार दीपकराव चव्हाण यांचे आवाहन — “मानवतेच्या भावनेतून पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करूया”

फलटण (प्रतिनिधी) : सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या 9 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या एकसष्ठी  निमित्त आयोजित सर्व कार्यक्रम महाराष्ट्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आले आहेत. राज्यभरातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान सहन करावे लागत असल्याने या दु:खद प्रसंगी आनंदोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर बोलताना माजी आमदार दीपकराव चव्हाण म्हणाले की,
“राज्यात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे 22 लाख हेक्टर क्षेत्रातील शेती बाधित झाली आहे. अनेक शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे साधन नष्ट झाले असून सोलापूर जिल्ह्यातच दहा हजारांहून अधिक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. अशा कठीण काळात आपण मानवतेची जाणीव ठेवून पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला पाहिजे.”

शासन आपले कर्तव्य पार पाडेलच, मात्र फलटणचे राजघराणे संकटाच्या काळात नेहमी मदतीसाठी पुढे आले आहे, असे चव्हाण यांनी नमूद केले. त्यांनी सांगितले की, यापूर्वी सांगली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती, त्यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मदत पोहोचविण्यात आली होती.

संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसाचे कार्यक्रम काही दिवसांसाठी स्थगित करून त्याच निमित्ताने सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी धान्य, चारा, कपडे, ब्लँकेट यांसारख्या वस्तूंच्या माध्यमातून मदत पोहोचविण्याचे आवाहन माजी आमदार चव्हाण यांनी केले.

या बैठकीस श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, फलटण तालुका सहकारी दूध संघाचे चेअरमन धनंजय पवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धैर्यशील (दत्ता) अनपट, माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे, शंकरराव माडकर, बापूराव गावडे, जयकुमार इंगळे, दादासाहेब चोरमले आदी मान्यवर उपस्थित होते.